वर्धा : शहीदांची आष्टी म्हणून इतिहासात अजरामर झालेल्या आष्टीत दरवर्षी नागपंचमीस शहीद दिन साजरा केल्या जातो. या पावन भूमीचे जतन करण्याहेतूने या क्रांतीस्थळास स्फूर्ती स्थळाचा दर्जा मिळावा म्हणून अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते.अखेर त्यास यश आले आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांनी ही बाब मनावर घेत शासनाकडे धाव घेत असा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. विकासासाठी पहिल्या टप्प्यात दीडशे कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> वर्धा : तो ‘वाणी’ परवडला, पण ‘हा’ वाणी नक्को रे बाप्पा, ग्रामीण भागातील सूर
हा आराखडा लवकरच अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट होईल.त्यात निधीची तरतूद झाल्यानंतर कामाला सुरवात केल्या जाणार आहे.मी शेवटपर्यंत यात लक्ष घालणार , अशी ग्वाही वानखेडे यांनी दिली आहे.१९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात या परिसरातील सहा वीरांनी हौतात्म्य पत्करले होते. त्यांची स्मृती कायम जागत ठेवण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार. त्यासाठी हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष भरत वणझारा यांनी वानखेडे यांना यात लक्ष घालण्याची केलेली विनंती फलदायी ठरली. या स्फूर्ती स्थळाच्या बांधकामात इथला संपूर्ण इतिहास चितारल्या जाईल.लढ्यातील विविध प्रसंग तैलचित्रे स्वरूपात साकारणार. शहीदांचे पुतळे व अन्य कामे होणार असल्याची माहिती मिळाली.