आज नागपूरमध्ये ‘नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स’ची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अभूतपूर्व गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली आहे. या व्यापारी संस्थेच्या सत्ताधारी आणि विरोधी गटातील सदस्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, आज सकाळी नागपूरमध्ये ‘नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स’ची ७८ वी वार्षिक बैठक पार पडली. यावेळी सभेत गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली आहे. अश्विन मेहाडिया यांचा विद्यमान सत्ताधारी गट आणि डिपेन अग्रवाल यांचा विरोधी गट यांच्यात हा राडा झाला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा- VIDEO: शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांची खबरदारी, चेहऱ्याला लावलं ‘प्लॅस्टिक कवच’
वार्षिक सर्वसाधारण सभेत असामाजिक घटकांना बोलवण्यात आलं होतं. तसेच सत्ताधारी गटाने प्रस्तावावर कोणतीही चर्चा न करता बळजबरीने प्रस्ताव पारित केला, असा आरोप विरोधी गटाकडून करण्यात आला. त्यामुळे गोंधळाला सुरुवात झाली. यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे.
हेही वाचा- “संजय राऊतांना दिवास्वप्न पडतात, ते…”, महामोर्चातील ‘त्या’ विधानावरून चित्रा वाघ यांची टोलेबाजी!
सत्ताधारी गट आमचं ऐकत नाही, म्हणून आम्हाला व्यासपीठावर जावं लागलं, असा आरोप विरोधी गटाकडून करण्यात आला आहे. तर सुरुवातीपासूनच काही लोक नियमांचं पालन करत नव्हते, वारंवार व्यासपीठावर जाऊन गोंधळ घालत होते. त्यामुळे वादाला सुरुवात झाली, असं सत्ताधारी गटाचं म्हणणं आहे. या प्रकरणी अद्याप कोणत्याही गटाकडून पोलीस तक्रार दाखल केली नाही.