नागनदीच्या संरक्षण भिंतीचा प्रश्न ऐरणीवर
नागनदी स्वच्छतेचा मोठा गाजावाजा करत असताना या नदीच्या वीस वर्ष जुन्या संरक्षक भिंतीच्या विदीर्ण अवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. पण यंत्रणेने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यावेळीच उपाययोजना झाल्या असत्या तर नुकत्याच आलेल्या पुरामुळे जीव आणि वित्त हानी टाळता आली असती असे आता स्पष्ट झाले आहे.नाग नदीच्या काठावर राहणाऱ्या वस्त्यांतील नागरिकांनी आणि त्या भागातील नगरसेवकांनी याकडे प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधूनही प्रशासनाची कुंभकर्णी झोप अद्यापही उघडली नसल्याचे दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातून वाहणाऱ्या नागनदीच्या संरक्षक भिंतीचे काम २० वर्षांपूर्वीचे आहे. त्याची नियमित देखभाल, दुरुस्ती होणे आवश्यक आहे. मात्र तसे झाले नाही. मधल्या काळात अनेक वेळा पुराचा फटका या भिंतीला बसला त्यामुळे ती अधिक विदीर्ण झाली. गत ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला त्यातच तलावातील पाणी सोडण्यात आल्याने नदी प्रवाहाला गती आली व त्यामुळे अनेक ठिकाणी भिंत पडून परिसरातील नागरिक वाहून गेले तर काहींच्या घरात पाणी शिरल्याने कोटय़वधी रुपयांच्या साहित्याची हानी झाली होती. विशेष म्हणजे नागनदी स्वच्छता अभियान राबविताना त्यावर महापालिकेने लाखो रुपये खर्ची घातले. त्याच वेळी या भिंतीची सद्यस्थिती प्रशासनाच्या नजरेत आली होती. पण केवळ स्वच्छतेचा गाजावाजा करण्यातच यंत्रणा मशगूल राहिल्याने नदी तीरावरील नागरिकांना संकटांना तोंड द्यावे लागले. स्वच्छतेच्या वेळी उपसलेला गाळ तेथेच ठेवल्यानेही पाण्याचा निचरा झाला नसल्याचे नागरिक आताही सांगतात.पुराच्या घटनेला एक महिना होत आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहरातील सर्व आमदार, महापौर प्रवीण दटके यांनी शहराचा दौरा करून पूर येण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या घटकांचा अभ्यास केला. तेव्हाही त्यांना संरक्षक भिंत खचल्याने ठिकठिकाणी पाणी शिरल्याचे लक्षात आले. यासाठी वेगळया निधीची मागणी महापौरांनी शासनाकडे केली आहे. मात्र पावसाळापूर्व नियोजनाच्या वेळी हे पाऊल उचलण्यात आले असते व भिंतीचे किमान काही ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेतले असते तर धोका टळू शकला असता, असे आता नागरिक सांगू  लागले आहे.नदीत वाहून गेल्याने काचीपुऱ्यातील एका गरीब रिक्षाचालकाला आपले प्राण गमवावे लागले. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्याच्याकडे जाऊन शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द केला असला तरी संरक्षण भिंतीच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाला कोणाच्या मृत्यूची वाट का पाहावी लागली हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने यासंदर्भात एक निवेदन महापालिका आयुक्तांना दिले असून, संरक्षक भिंतीचे बांधकाम तातडीने सुरु करण्याची मागणी केली आहे. वीस वर्षांपेक्षा अधिक काळ जुनी भिंत बांधली नाही तर वारंवार  पुराच्या घटनांना गरीबांना तोंड द्यावे लागेल,याकडे पक्षाचे उपाध्यक्ष अब्दुल कादीर शेख यांनी लक्ष वेधले आहे.

Story img Loader