अमरावती : सौरऊर्जेचे महत्त्व जाणत अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील नागरवाडी या गावाने पहिले शंभर टक्के सौरग्राम होण्याचा मान मिळवला आहे. सौरऊर्जेच्या प्रकाशात झळाळणाऱ्या या गावाने प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत ही किमया साध्य केली आहे.छतावर सौर प्रकल्प बसवून वीज निर्मितीला सुरूवात केल्यामुळे पुढील काळातील गावाचे विजेचे बिल शून्य होणार आहे. चांदूर बाजार पासून २० किमी अंतरावर असणारे संत श्री गाडगे महाराज संस्थान नागरवाडी या गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा आहे. आश्रम शाळा,वस्तीगृह आणि एकुण १० शिक्षक सदनिकाचा यात समावेश आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेतील प्रति किलोवॅट ३० हजार रूपये अनुदानाचा लाभ घेत याठिकाणी १० शिक्षक सदनिकेच्या छतावर प्रति १ किलोवॅटचे सौर प्रकल्प बसविण्यात आले. त्याचबरोबर संस्थेसाठी ७.५ किलोवॅटचे स्वतंत्र सौर प्रकल्प (विना अनुदान) बसविण्यात आले आहे. त्यामुळे एकून १७.५ किलोवॅटची सौर यंत्रणा बसविण्यात आल्यामुळे महिन्याला सरासरी २००० हजार युनिटची वीज निर्मिती होणार आहे व वीज देयकात तेवढीच बचत होणार आहे.
संत श्री गाडगे महाराज संस्थान व आश्रम शाळा तसेच नागरवाडी गावातील सर्व वीज जोडण्या सौर प्रकल्पाला जोडल्यामुळे नागरवाडी हे पहिले सौरग्राम ठरले आहे.नागरवाडी गावाने पुढाकार घेत छतावरील सौर प्रकल्पाच्या माध्यमातून वापरासाठी लागणारी वीज स्वत: निर्माण करण्याला सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील इतर गावांनीही नागरवाडी गावाचा आदर्श घेत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेचा लाभ घेत आपल्या छतावर सौर प्रकल्प बसवून वीजनिर्मिती करण्याचे आवाहन मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले. नागरवाडी गाव हे ‘सौरग्राम’ म्हणून उदयास आलेले वर्धा जिल्यातील चिचघाट नंतर विदर्भातील दुसरे गाव आहे. यासाठी बापूसाहेब देशमुख यांचा पुढाकार आणि मोलाचे सहकार्य लाभल्याचे कार्यकारी अभियंता विजय कुमार कासट यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात तसेच ऊर्जा सचिव आभा शुक्ला आणि महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र,संचालक (संचालन) अरविंद भादीकर, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे,प्रादेशिक संचालक, नागपूर परेश भागवत, कार्यकारी संचालक (विशेष प्रकल्प) धनंजय औंढेकर यांच्या पुढाकाराने प्रत्येक जिल्ह्यातील किमान दोन गावे ही शंभर टक्के सौरग्राम करण्याचे नियोजन आहे. यावेळी या संस्थानचे संस्थापक बापूसाहेब देशमुख, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट, उपकार्यकारी अभियंता दिनेश भागवत हे प्रामुख्याने उपस्थित होते.