नागपूर: जुनी पेन्शन योजना शासन देणार नाही. कारण दिल्यास राज्य दिवाळखोरीत निघेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात जाहीर केले. जुनी पेन्शन योजना दिल्यास राज्यावर १ लाख १० हजार कोटींचा बोजा पडेल व राज्य दिवाळखोरीत निघेल. त्यामुळे शासन जुनी पेन्शन देणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. असे असतानाही भाजप समर्थित महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार नागो गाणार यांनी ‘एकच मिशन जुनी पेन्शन’चा नारा देणारी टोपी घालून उमेदवारी अर्ज भरतानाच फडणवीसांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून आले.
नागो गाणार यांनी गुरुवारी शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गाणार आणि त्यांच्या समर्थकांनी ‘एकच मिशन जुनी पेन्शन’चा नारा देणारी टोपी घातली होती. एकीकडे फडणवीसांनी जुनी पेन्शन देणार नाही. जुनी पेन्शन योजना दिल्यास राज्यावर १ लाख १० हजार कोटींचा बोजा पडेल व राज्य दिवाळखोरीत निघेल असा थेट इशारा दिला असता त्यांच्याच पक्षाचे समर्थित उमेदवार गाणारांनी जुन्या पेन्शचा नारा देत शिक्षक मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही होत आहे.