नागपूर : समता नगर परिसरात एक दहा वर्षीय मुलगा पतंग उडवत होता. पतंग उडवतांना तो वीज यंत्रणेवर धडकला. तोल गेल्यावर मांजाऐवजी जिवंत वीज तारेला स्पर्श होऊन तो भाजला गेला. तातडीने त्याला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. येथील अतिदक्षता विभागात मुलाचा जीवन- मृत्यूशी संघर्ष सुरू आहे.
संक्रांत जवळ असल्याने पतंग उवडण्याची स्पर्धा रंगली आहे. समता नगर परिसरातही या स्पर्धेतून हा मुलगा वीज यंत्रणेवर धडकला आणि भाजला गेला. परिसरातील नागरिकांनी तातडीने महावितरण आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. मुलाला तारेतून वेगळं करून तातडीने उपस्थितांनी मेडिकल रुग्णालयात हलवले. मेडिकलमध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. अक्षय सज्जनवार, प्लास्टिक सर्जन डॉ. नेहा गुप्ता व पेडियाट्रिक्स सर्जन डॉ. सावजी यांनाही माहिती दिली गेली. मुलावर तातडीने शस्त्रक्रियाही झाली. सध्या मुलाची प्रकृती अत्यवस्थ आहे.
हेही वाचा : सावधान! पशुधनाला ‘लाळ खुरकत’ विषाणुजन्य रोगाचा धोका, दूध उत्पादनावर परिणामाची शक्यता
राज्यात वर्षाला २० हून अधिक मृत्यू
मकर संक्रांतीला काही व्यक्ती निष्काळजीपणे पतंग उडवत असल्याने पतंग व मांजा वीज यंत्रणेवर अडकून राज्यात १ हजारांवर भागात वीज यंत्रणेला फटका बसून हजारो नागरिक तासंतास अंधारात राहतात. यातूनच वर्षाला २० हून अधिक मृत्यू होत असल्याचेही निरीक्षण महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून नोंदवले जाते. दरम्यान सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मिळतो. या मांजावर विशिष्ट रसायनाचे आवरण असते. हा मांजा वीजतारेत अडकल्यास त्यामधून प्रवाह पतंग उडविणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचून अपघाताची शक्यता असते. शहरी भागात अपुऱ्या जागेमुळे घराच्या छतावर पतंग उडविताना घरावरून गेलेल्या वीजतारांचा विसर पडत असल्यानेही अपघात होतात. त्यामुळे पतंग उडवतांना काळजी घेण्याची गरज असल्याचे महावितरणचे म्हणने आहे.
हेही वाचा : वर्धा : वर्षभरापासून लैंगिक शोषण, अखेर सापडला भिमा कोरेगावला
अपघात टाळण्यासाठी महत्वाचे…
- वीजतारांवर अडकलेला पतंग काढणे जीवावर बेतू शकते.
- तारेत अडकलेला पतंग काढण्याचा अट्टहास करू नये.
- वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवू नये.
- पतंग किंवा मांजा काढायला रोहित्रावर चढू नये.
- धातूमिश्रित मांजाचा वापर कटाक्षाने टाळा.
- दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नका.
- पतंग उडविणाऱ्या पाल्यांकडे पालकांनी लक्ष दयावे.