नागपूर: जिल्ह्यात २०११ पासून गरोदर मातांची सिकलसेल तपासणी होत आहे. त्यात १० हजार ३८१ स्त्रिया सिकलसेल वाहक असल्याचे पुढे आले आहे. १९ जूनला जागतिक सिकलसेल दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

सिकलसेलचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यात नागपूरचाही समावेश आहे. २०११ पासून जिल्ह्यात गरोदर मातांची सिकलसेल तपासणी होत असून त्यात १० हजार ३८१ सिकलसेल वाहक आढळले. २४४ स्त्रियांना सिकलसेल असल्याचेही स्पष्ट झाले. त्यांच्या आई-वडिलांची तपासणी केली असता ३२९ आई-वडील दोघेही सिकलसेलग्रस्त अथवा वाहक असल्याचे पुढे आले.

हेही वाचा – नागपूर : उड्डाणपूल झाले तरी वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी…

गरोदर मातांच्या गर्भजल चाचणीत ५१ गर्भांनाही सिकलसेलचे निदान झाले. त्यामुळे हा आजार पुढच्या पिढीकडे जाऊ नये म्हणून लग्नापूर्वीच मुलगा व मुलीने सिकलसेल तपासणी करून विशेष काळजी घेण्याची गरज आहे. राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात टप्पा १ नुसार, २००९ पासून नियमित व विशेष गावनिहाय, शाळानिहाय आणि इतर स्तरावर लाभार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण २.४७ लाख तपासण्या करण्यात आल्या. त्यात ३४ हजार ९५२ जण सिकलसेल वाहक तर २ हजार ८१७ जण सिकलसेलग्रस्त आढळले. सिकलसेलग्रस्तांमध्ये गुंतागुंत वाढू नये व वारंवार रक्त देण्याची गरज पडू नये म्हणून हायडाक्सीयुरिया हे औषध सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे म्हणणे आहे.

सिकलसेल म्हणजे काय?

सिकलसेल हा आनुवंशिक आजार असून यामध्ये असामान्य हिमोग्लोबीन आढळते. रक्तात लाल व पांढऱ्या अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरातील लाल रक्तपेशींचा आकार गोल असतो. पण सिकलसेल आजारामध्ये या पेशींचा आकार विळ्यांसारखा होतो. इंग्रजी भाषेत सिकल म्हणजे विळा व सेल म्हणजे पेशी. म्हणून या आजारास विळ्यांसारख्या दिसणाऱ्या लाल रक्तपेशींचा आजार म्हणजेच सिकलसेल म्हणतात. सिकलसेल आजाराचे दोन प्रकार आहेत. सिकलसेल वाहक व सिकलसेल ग्रस्त.

हेही वाचा – धक्कादायक! नागपुरातील उच्चभ्रू परिसर धरमपेठ, मंगळवारीत चिकनगुनियाचा प्रकोप

सिकलसेल ॲनिमियाची लक्षणे

सिकलसेल ॲनिमियाची काही लक्षणे आहेत. त्यात थकवा आणि धाप लागणे, मुलांमध्ये मंद वाढ आणि यौवनात विलंब, वारंवार संक्रमन, स्ट्रोक, डोळ्यांच्या समस्या, अंधत्व समावेश आहे. सोबत कावीळ (त्वचा पिवळसर होणे आणि डोळे पांढरे होणे) फिकट त्वचा आणि नखे ही लक्षणे आहे.