नागपूर : पटन्यात( बिहार )राहणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थिनीचे नागपुरातील अकरावीच्या विद्यार्थ्यासह सूत जुळले. दोघांनीही घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. ती पाटणन्यावरुन रेल्वेने नागपुरात पोहचली तर तो रेल्वेस्थानकावर तिची वाट बघत उभा होता. मात्र, यादरम्यान, तरुणीच्या आईने मुलगी पळाल्याची तक्रार केली. पोलिसांनी रेल्वेस्थानकावर सापळा रचला. प्रियकर आणि प्रेयसीची भेट होण्यापूर्वीच पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आणि आईवडिलांच्या ताब्यात दिले. अशाप्रकारे ‘एक अधुरी प्रेम कहाणी’ रेल्वेस्थानकावर बघायला मिळाली.
रिया (काल्पनिक नाव) असे त्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. ती १६ वर्षाची असून इयत्ता अकराव्या वर्गात शिकते. एका लग्नात ती मामाकडे गेली होती. त्या लग्नातच एक मित्र भेटला. तो नागपुरातील रहिवासी आहे. पहिल्याच भेटीत ते दोघेही एकमेकांकडे आकर्षीत झाले. नियमित मोबाईलवर बोलत असल्याने त्याची मैत्री हळूहळू फुलत गेली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. त्यामुळे त्यांनी कुटुंबाचे बंधन तोडून त्यांना भावी आयुष्याची स्वप्न रंगविले. त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याने रियाला नागपुरात बोलाविले. रियाने सिंदूर, पायपट्टी, नवीन कपडे घेतले. ठरल्याप्रमाणे रिया शनिवारी सकाळी संघमित्रा एक्सप्रेसने नागपूरसाठी निघाली. दरम्यान रिया घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पाटणन्याहून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असून ती संघमित्रा एक्सप्रेसने निघाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यांनी एक पथक तयार केले. त्यांच्या व्हॉट्स अॅपवर रेशमाचे छायाचित्र होते. गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर येण्यापूर्वीच हे पथक फलाट क्रमांक तीनवर उपस्थित झाले. गाडी येताच त्यांनी प्रत्येक डब्याची झडती घेतली. अखेर रिया एका कोचमध्ये त्यांना दिसली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मुलगी सुखरुप असल्याची माहिती तिच्या कुटुंबाला दिली. रियाला शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले.
हेही वाचा…Tiger Deaths : राज्यात १९ दिवसांत आठ वाघांचा मृत्यू, शिकारीचा संशय; वन खात्याचे दुर्लक्ष
प्रियकर स्टेशनवरच वाट बघत उभा
प्रेयसीच्या भेटीसाठी आतूर प्रियकर रेल्वेस्थानकावर उपस्थित होता. मात्र, डब्यातून उतरण्यापूर्वीच पोलिसांनी रियाला ताब्यात घेतले. प्रियकराला काही सांगण्याची संधीसुध्दा तिला मिळाली नाही. पोलिसांनी रियाची विचारपूस केली असता ‘आता मी घरी जाणार नाही, अशी भूमिका तिने घेतली.