नागपूरमध्ये एका धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला होता. या मृत्यूचं कारण आता समोर आलं आहे. गळफास कसा घ्यायचा आणि कसा काढायचा हे यूट्यूबवर पाहत असताना या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
नागपूरमधील सोमवारी क्वार्टर परिसरात अग्रण्य सचिन बारापात्रे हा १२ वर्षीय मुलगा आपल्या आई-वडिलांसह राहत होता. २५ जानेवारीला १२ वर्षीय मुलाचे आई-वडिल कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा अग्रण्य गच्चीवर गळफास घेतलेल्या स्थितीत शेजाऱ्यांना आढळला. त्याला नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पोलिसांनी केलेल्या तपासात अग्रण्याला मोबाईलचे व्यसन असल्याचं समोर आलं आहे. गळ्यात गळफास लटकवून तो कसा काढायचा याचे व्हिडीओ तो सतत बघत होता. अग्रण्य तसा प्रयत्न करायला गेला आणि त्यातून त्याचा मृत्यू झाला, असं तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी नागपूरमधील सक्करदरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
हेही वाचा : “गौतम अदानी आणि पंतप्रधानांचे संबंध पाहता…”, ‘हिंडनबर्ग’च्या अहवालावरून काँग्रेसची चौकशीची मागणी; म्हणाले…
सक्करदरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांनी सांगितल्यानुसार, “अग्रण्यवर मनोरुग्ण डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. त्याला यूट्यूबवर व्हिडीओ पाहण्याचा सवय होती. त्याने डोळे बांधून हात कसा सोडवायचा, हा व्हिडीओ पाहिलेला आढळला आहे. आईच्या साडी आणि ओढणीने तो घरात झोपाळा बांधायचा आणि त्याबरोबर खेळायचा. ही आत्महत्या नसून अपघात आहे,” अशी माहिती धनंजय पाटील यांनी दिली.