नागपूर : मुळात लग्न कोणाशी करावे, कधी करावे, करावे की करू नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तरीही लग्न करण्याला भारतात अतिशय महत्त्व आहे. काळानुरूप लग्नाबद्दलच्या संकल्पना बदलल्या आहेत, बदलत आहेत. तरीही लग्नाचे महत्त्व कमी झालेले नाही. लग्न तुटणे म्हणजे घटस्फोट हीसुद्धा कोणत्याही जोडप्याच्या आयुष्यातली दु:खद घटना आहे. घरात सासरेबुवा हॉलमध्ये टीव्ही पाहतात, मला तसा पाहता येत नाही किंवा लग्नापूर्वी आणलेला कुत्रा नवरा बांधून ठेवत नाही. त्याचे केस घरभर होतात अशा कारणांनी विभक्त होणाऱ्या २३ घटस्फोट व कौटुंबिक वाद प्रकरणांतील पती-पत्नी यांच्यामध्ये आपसी समझोत्याने मनोमिलन होऊन पुन्हा नव्याने सुखाचा संसार सुरू झाला.
हेही वाचा :
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ५६ हजार ८३१ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली आहेत. या प्रकरणांचे एकूण तडजोड मूल्य १४३ कोटी रुपये आहे. जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कर्ज वसूली न्यायाधीकरण, सहकार न्यायालय, औद्योगिक व कामगार न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालूका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन ९ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी २३ घटस्फोट व कौटुंबिक वाद प्रकरणांतील पती-पत्नी यांच्यामध्ये आपसी समझोत्याने मनोमिलन होउन पुन्हा नव्याने सुखाचा संसार सुरू झाला.