नागपूर : नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरूणाईची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. मात्र, पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि करडी नजर युवकांच्या उत्सवावर असल्यामुळे तरूणाईचा काहीसा हिरमोड होणार आहे. मद्यपींवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून गोंधळ घालणाऱ्यांची रात्र पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे निश्चित आहे. वाहतूक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि विशेष पथक पोलिसही पहाटेपर्यंत रस्त्यावर पहारा देतील. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पार्टी साजरी करून घराकडे परतणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
पोलीस विभागाने सुरक्षा व्यवस्थेसाठी जवळपास २५०० पोलीस अधिकारी-कर्मचारी सज्ज ठेवले आहेत. “थर्टी फर्स्ट’साठी शहरातील मोठमोठे हॉटेल्स, लॉन्स, खानावळी, ढाबे आणि सभागृह सजले आहेत. युवकांना आकर्षित करण्यासाठी फेसबूक, वॉट्सऍप, मेल आणि अन्य माध्यमांनी पार्ट्यांबाबत संदेश पोहचविण्यात आले. यासोबत नाईट क्लब, बॅश, फ्लोअर डान्स, बारही सज्ज झाले आहेत.
हेही वाचा: ‘ये ना चालबे’! सत्ता स्थापनेसाठी विमान पाठवता, अन्…; आमदार जोरगेवार यांचा सरकारला चिमटा!
रस्त्यावर गोंधळ घालणारे आणि सुसाट वाहने चालविणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ३२ गस्त वाहनांसह १२० चार्ली पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाने ७०० पोलीस कर्मचारी मंगळवारपासूनच तैनात केले आहेत. त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना दंडासह रात्र पोलीस ठाण्यात काढावी लागणार आहे. अंबाझरी, सिव्हिल लाइन्स, शंकरनगर, धरमपेठ, फुटाळा तलाव, वर्धमाननगर, मेडिकल चौक, अजनीत पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांचे पथक तैनात करण्यात येतील. त्यांच्याकडे ‘स्पीड गन व ब्रीथ ऍनालायझर‘ राहणार असून दंडात्मक कारवाईऐवजी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
बाराच्या आत ‘आवाज‘ बंद
पोलिसांची खासगी पार्ट्यांवरही नजर असणार आहे. त्यामुळे कुणालाही परवानगीशिवाय लाऊडस्पिकर वाजविता येणार नाही. खुल्या जागेवर पार्टीचे आयोजन करीत असताल तर लाऊडस्पिकर रात्री बारा वाजता बंद करावा लागणार आहे. अन्यथा लाऊडस्पिकर जप्त करून आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
New Year 2023 : नवीन वर्षानिमित्त Special Gift द्यायचंय? मग ‘या’ ९ ‘Gadgets’चा करू शकता विचार
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करणाऱ्यांनी कायद्याचे भान ठेवावे. कोणत्याही सामान्य नागरिकांची पोलीस नियंत्रण कक्षात तक्रार आल्यास थेट कारवाई करण्यात येईल. कुणालाही त्रास होऊ नये, याची काळजी घ्यावी. पोलिसांचे २४ भरारी पथक शहरात फिरणार असून रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त.