नागपूर : हिंगण्यातील एका दाम्पत्याने टपाल विभागाचे एजंट बनून नागरिकांना सव्वादोन कोटी रुपयांचा गंडा घातला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे. पोलिसांनी नलिनी पुरुषोत्तम तांबुलकर (५२) रा. महाजनवाडी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपी महिलेला अटक केली आहे. मात्र, तिचा पती फरार आहे. प्रदीप किसन खंगार (५०) आणि वंदना प्रदीप खंगार (४५) रा. रायपूर, हिंगणा असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे.

ठकबाज खंगारने शेकडो ठेवीदारांकडून आरडी आणि एफडीएच्या नावे पैसे घेतले. मात्र, त्यांच्या टपाल खात्यात जमा केले नाही. रायपूर ग्रामपंचायत येथील रहिवासी प्रदीप खंगारने पत्नीच्या नावावर टपाल खात्याची एजन्सी घेतली. लोकांच्या घरी जाऊन तो बचत योजनांसाठी पैसे गोळा करीत होता. पंचवीस ते तीस वर्षांपासून या क्षेत्रात काम करीत असल्याने खातेदारांचा विश्वास संपादन केला होता. दैनंदिन पैसे वसुलीसाठी तो फिरायचा. अचानक २७ जून २०२४ पासून तो बेपत्ता झाला. त्यामुळे ग्राहकांनी टपाल कार्यालयात जाऊन चौकशी केली असता त्याने २०२२ पासून खातेदारांची रक्कम भरली नसल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – पुन्हा विधानसभा गाठण्यासाठी सुनील केदारांचा ‘सर्वोच्च’ प्रयत्न, उद्या न्यायालयात जो निर्णय…

लोकांना संशय आला आणि त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या खात्यांत पैसेच जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले. नलिनी यांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर इतरही लोक तक्रारीसाठी येऊ लागले. त्यामुळे खातेदारांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी पोलीस स्टेशन हिंगणा येथे तक्रार केली. शेकडो गुंतवणूकदारांची त्याने फसवणूक केली होती.

चिंतीत गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीला हिंगणा पोलीस ठाणे गाठले होते. मात्र, खंगार बेपत्ताच होता. या प्रकरणात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नलिनी पुरुषोत्तम तांबूलकर (५२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रदीप व त्याची पत्नी वंदना खंगार (४८) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संबंधाचे संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – अंबाझरी तलावातील पाणी ‘ओव्हरफ्लो’ पातळीपर्यंत

फसवणुकीची रक्कम १० कोटींच्या पुढे

सद्यस्थितीत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात फसवणुकीचा आकडा २.२५ कोटी इतका आहे. मात्र, हा आकडा १० कोटींहून अधिक आहे. खंगार अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. खंगारकडे पैसे सोपविणारे अनेक ठेवीदार हे गरीब किंवा निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. मुलांच्या भविष्यासाठी लोकांनी पोस्टात बचत होईल, या विचारातून खंगारवर विश्वास टाकला होता. मात्र, त्याने विश्वासघात केला. आपले पैसे कधी परत मिळणार, हा प्रश्न घेऊन ठेवीदार पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहेत.

पोलिसांनी वंदनाला अटक केली आहे. प्रदीप तक्रारीपूर्वीच फरार झाला होता. आतापर्यंत ८५ जणांनी पोलिसात तक्रार केली आहे. पोलिसांनी फसवणुकीसह एमपीआयडी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. – विनोद गोडबोले, ठाणेदार, हिंगणा पोलीस स्टेशन.