नागपूर : मेयो रुग्णालयात बीपीएमटी अभ्यासक्रमांतर्गत इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्याचा उपचारातील विलंबाने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणात मेयो प्रशासनाने गठित केलेल्या अंतर्गत समितीचा अहवाल सोमवारी सादर झाला. त्याआधारे मेयो प्रशासनाने एका वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली केली तर निवासी डॉक्टरांवरील कारवाईचा चेंडू शैक्षणिक परिषदेकडे टोलवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेयो प्रशासनाकडून नियुक्त चौकशी समितीने सोमवारी अधिष्ठात्यांना अहवाल सादर केला. त्यानंतर लगेच घटनेच्यावेळी मेयोच्या आकस्मिक विभागात तैनात मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याची तातडीने उत्तर नागपुरातील डॉ. आंबेडकर रुग्णालयात बदली करण्यात आली. हा अधिकारी सध्या ‘प्रोबेशन’वर आहे. त्यामुळे हा कालावधीही २ वर्षाहून एक वर्षे वाढवून ३ वर्षे करण्याचा प्रस्तावही मेयो प्रशासनाने शासनाला पाठवला आहे.

हेही वाचा – बँक खाते, एटीएमला तुम्ही जन्मतारीख पासवर्ड ठेवलाय का ? मग आत्ताच सावध व्हा; कारण….

घटनेच्यावेळी आकस्मिक अपघात विभागात तैनात तीन निवासी डॉक्टरांची या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्यासाठी हे प्रकरण मेयोच्या शैक्षणिक परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. निवासी डॉक्टरांचा दोष आढळल्यास त्यानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. युनिट प्रमुखाचा पदभार एका विभागप्रमुखांकडे दिला आहे. या प्रकरणात एकाही दोषीला सोडणार नाही, अशी खात्री मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

प्रकरण काय?

मेयो रुग्णालयात बीपीएमटी अभ्यासक्रमांतर्गत ‘इंटर्नशिप’ करणाऱ्या फैज मोहम्मद खान (२२, रा. काटोल रोड) या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला. अपघातानंतर विद्यार्थ्याला मेयोच्या आकस्मिक विभागात हलवले गेले होते. परंतु, त्याला मेडिकलच्या ट्रामा केयरमध्ये हलवण्याचा सल्ला देण्यात आला. ट्रामामध्ये नेण्याच्या पूर्वीच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. या विद्यार्थ्याच्या इंटर्नशिपला शेवटचा एक महिनाच शिल्लक होता. दरम्यान घटनेनंतर फैजवर मेयोमध्येच उपचार न करता मेडिकलला का पाठवले, यावर बीपीएमटीच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी अधिष्ठाता डॉ. चव्हाण यांना जाब विचारला. डॉ. चव्हाण यांनी याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करून तातडीने अहवाल देण्याचे आदेश दिले होते. दरम्यान या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी घटनेनंतर मेयो परिसरात कुटुंबीय, बीपीएमटीच्या विद्यार्थ्यांसह काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाकडून आंदोलन झाले होते.

हेही वाचा – एमपीएससीकडून महत्त्वाच्या सूचना जाहीर, उमेदवारांनी पर्याय बदलताना….

पुन्हा आंदोलनाची शक्यता…

मेयोतील सदर घटनेनंतर दगावलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांसह बीपीएमटीच्या संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन करत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. परंतु मेयो प्रशासनाकडून केवळ एका डॉक्टरची बदली केली गेली. त्यामुळे ठोस कारवाई झाली नसल्याचे सांगत या सगळ्यांकडून मेयोत पुन्हा आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“मेयो प्रशासनाने घटनेला गांभिर्याने घेत तातडीने एका वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली केली असून संबंधित युनिटच्या प्रमुखाचे पद काढून तेथे विभाग प्रमुखाला पदभार दिला आहे. दुसरीकडे निवासी डॉक्टरांवरील जबाबदारी निश्चित करण्यासाठी शैक्षणीक परिषदेकडे जबाबदारी दिली आहे. त्यांच्या अहवालात कुणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाईबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवला जाईल.” – डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता, मेयो रुग्णालय, नागपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur a doctor died in an accident allegation of death due to delay in treatment mnb 82 ssb