नागपूर : नागपुरात उन्हाचा तडाखा सुरू झाला असून तापमान ४५ अंशांवर गेले आहे. उन्हाळ्यात शहरातील वेगवेगळ्या भागात आगीच्या घटना वाढल्या आहेत. यावेळी ग्राहकांना दुरुस्तीपर्यंत विजेसाठी ताटकळत राहावे लागले. सोमवारी शिवाजीनगरमध्येही वीज वितरण पेटी पेटली.
उपराजधानीतील शिवाजीनगर सिमेंट रस्त्याच्या कोपऱ्यावर महावितरणचा ट्रान्सफाॅर्मर आणि वितरण पेटी आहे. सोमवारी दुपारी तेथून अचानक धूर निघायला लागला. थोड्याच वेळात आगीने उग्ररूप धारण करत पेट घेतला. यावेळी वीज वितरण पेटीतून स्फोटसदृश्य लहान आवाज येत असल्याने परिसरात खळबळ उडाली. तातडीने महावितरणला माहिती दिली गेली.
हेही वाचा – शिवस्वराज्यदिनी सुवर्णकलशासह गुढी कशी उभारणार? सुवर्ण कलश आणायचा कुठून?
वीज कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठत प्रथम वीज पुरवठा खंडित केला. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यापूर्वी वितरण पेटी पूर्णपणे जळून राख झाली होती. दरम्यान, महावितरण कर्मचाऱ्यांनी इतर भागातून या भागात वीजपुरवठा वळवून ग्राहकांना दिलासा दिला. परंतु, बराच वेळ ग्राहकांना नवतपाच्या उकाड्यात विजेविना राहावे लागले. त्यातच उन्हाळ्याच्या काळात एप्रिल आणि मे महिन्यात महावितरणच्या वीज यंत्रणेत आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. या दोन महिन्यात शहरातील वेगवेगळ्या भागात सुमारे ३० ते ३५ वीज वाहिनी, वीज तार, वितरण पेटी वा इतर वीज यंत्रणेला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. ट्रान्सफार्मरमध्ये ऑईल राहत असल्याने उन्हाळ्यात या यंत्रणेत पेट घेण्याचे प्रमाण वाढते. परंतु, वीज कर्मचारी तातडीने घटनास्थळी जाऊन दुरुस्ती करून ग्राहकांना दिलासा देत आहेत.
वाडीतील ग्राहकांचा महावितरणवर संताप
वाडीतील लाईफ स्टाईल सोसायटीमध्ये गेल्या एक ते दीड वर्षांपासून सतत सकाळी व रात्रीच्या वेळी अनेकदा वीज दाबाची तांत्रिक समस्या उद्भवत आहे. महावितरणकडे तक्रार केल्यावर तात्पुरती दुरुस्ती केली जाते. त्यानंतर काही दिवस पुरवठा सुरळीत होऊन पुन्हा हा कमी- अधिक दाबाचा प्रश्न सुरू होतो. या गोंधळात येथे अनेकांचे दूरचित्रवाणी संच, एसीसह इतरही महागडे विद्युत उपकरण पेटले आहे. मध्यंतरी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनासुद्धा ही माहिती देण्यात आली. त्यांच्या सूचनेने दुरुस्ती झाली. परंतु, पुन्हा ही समस्या सुरू झाली आहे.
अवकाळी पावसातही वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा मनस्ताप
नागपुरात यंदाच्या उन्हाळ्यात अधून- मधून अवकाळी पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेकदा वीज यंत्रणेत तांत्रिक दोषामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागला. आता पावसाळा तोंडावर असल्यामुळे पुन्हा वीज यंत्रणेत तांत्रिक दोषामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका आहे