नागपूर : ट्रकमधील माल उतरवत असताना हायड्रा क्रेनच्या चाकाखाली येऊन एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत घडली. संतोष दुलीचंद मासूरकर (४६) रा. अमरनगर, निलडोह, हिंगणा रोड असे मृताचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमआयडीसी परिसरातील ब्राईट इंडस्ट्रीमध्ये संतोष १० वर्षांपासून काम करीत होता. दुपारी २ वाजता एक ट्रक लोखंडी सळाखी घेऊन कारखान्यात आला. कारखान्याच्या गेटसमोर उभ्या ट्रकमधून हायड्रा क्रेनने (क्र. एमएच-४०/बीजे-५४२९) लोखंडी सळाखी उतरवण्याचे काम सुरू होते. संतोष क्रेनच्या पुढे चालत साखळीने बांधलेल्या सळाखींना खाली उतरवत होता. या दरम्यान अचानक पाय घसरून तो पडला. पण क्रेन चालकाच्या हे लक्षातच आले नाही आणि त्याने थेट वाहन त्याच्या अंगावरून नेले. तो चिरडला गेला. क्रेनचे चाक त्यांच्या पायापासून डोक्यापर्यंत गेल्याने संतोषचा जागीच मृत्यू झाला.

क्रेन चालक पसार

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. आरडा-ओरड झाल्याने चालकाने तत्काळ क्रेन थांबवली. समोरचे दृष्य पाहून तो घाबरला आणि वाहन सोडून पळून गेला. या घटनेनंतर अधिकारीही कारखान्यातून पसार झाल्याची चर्चा होती. घटनेची माहिती मिळताच संतोषची पत्नी अंजू व मुलगा अनिकेतसह परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

संतप्त जमाव व कुटुंबीयांचा आक्रोश

संतोष गत अनेक वर्षांपासून कारखान्यात काम करीत होता. त्यानंतरही व्यवस्थापकाने त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी किंवा पोलिसांना सूचना देण्याऐवजी कारखान्यातून निघून गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. यामुळे कंपनीविरुद्ध संतोषच्या कुटुंबीयांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. वाहन चालकासोबतच कंपनी व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली. तसेच त्यांना घटनास्थळी बोलावण्यात यावे. त्याशिवाय मृतदेह उचलू न देण्याची भूमिका नातेवाईकांसह नागरिकांनी घेतली होती. काही प्रतिष्ठीत नागरिकांनी कुटुंबीयांची समजूत घालून पोलिसांना सहकार्य केले.

कुटुंबाला भरपाईची मागणी

संतोष हा घरचा एकमेव कर्ता पुरुष होता. त्याला पत्नी अंजू, मुलगा अनिकेत आणि एक मुलगी आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबाची वाताहत झाली आहे. त्यांचा आधार हरपला आहे. त्यामुळे व्यवस्थापनाविरुद्ध कार्यवाही करून मासूरकर कुटुंबाला भरवाई देण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केले आहे.