नागपूर : एका भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दोन मुलांसह महिला बचावली तर तिची ननंद ठार झाली. ही दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास नवीन कामठी परिसरात घडली.
आलिया अंजूम (२७) आणि तिची दोन मुले पलक (८), दानिश (६) अशी नशीबवान मायलेकांचे नावे आहेत. शबाना परवीन (१९) सर्व रा. आजरी-माजरी, कळमना असे मृत तरुणीचे नाव आहे.
हेही वाचा – राज्यात नवी राजकीय आघाडी! रविकांत तुपकर यांची मोर्चेबांधणी; पुण्यात पदाधिकाऱ्यांची…
आलियाचे माहेर रमानगर, कामठीत आहे. रविवारी तिला आईच्या घरी जायचे होते. ती दोन मुलांसह तयार झाली आणि सोबत ननंद शबाना हिला घेतले. तिथून परत असताना आलिया दुचाकी चालवत होती तर शबाना दोन्ही मुलांसह मागे बसली होती. काही दूर अंतरावर गेल्यानंतर ट्रक चालक रंजित नेवारे (४८) रा. खापरखेडा याने भरधाव व निष्काळजीपणे ट्रक चालवून त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.
दुचाकीसह शबाना एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मायलेक पडले. शबानाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. ती रक्तबंबाळ स्थितीत पडून होती. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मायलेकसुद्धा ट्रकच्या चाकाजवळच पडली. मात्र, नियतीने त्यांना मृत्यूच्या दाढेतून ओढले. नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी मायलेकांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. शबानाचा मृत्यू झाला तर जखमी मायलेकांवर उपचार सुरु आहेत. घटनेनंतर नागरिकांची प्रचंड गर्दी केली. संतप्त नागरिकांमुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या मार्गावर नेहमीच अपघात होतात, त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करावी अशी स्थानिकांची मागणी होती. पोलिसांनी नागरिकांना शांत केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या प्रकरणी आरोपी ट्रक चालकाला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
हेही वाचा – नागपूर: रामझुला हिट अँड रन प्रकरण; रितू मालू म्हणते,‘आत्मसमर्पण नाही…’
ट्रकखाली येऊन युवक ठार
दुसऱ्या घटनेत एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. ऐतेशाम अहमद (२९) रा. येरखेडा असे मृतकाचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास जुनी कामठी पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. आरोपी ट्रक चालकाने अचानक आशा हॉस्पिटलसमोर वळण घेतल्याने ऐतेशामने जोरात ब्रेक मारले, यामुळे त्याचे संतुलन बिघडले व दुचाकी घसरून तो वाहनासह खाली पडला. जखमी अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी फिर्यादी मो. अनस अहमद (२२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.