नागपूर विभागांतर्गत २१ वर्षांत केवळ सातवी कारवाई

नागपूर : विविध सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कार्यरत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ची  भूमिका उत्पादन शुल्क विभागाच्या बाबतीत मवाळ झालेली दिसते. नागपूर एसीबीने गेल्या २१ वर्षांत उत्पादन शुल्क विभागात केवळ सात कारवाया केल्या आहेत. या आकडेवारीवरून उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचाराला एसीबी कार्यालयाचा एकप्रकारे वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे.

या चर्चेला बळ मिळण्याचे कारण, हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंद सिंग यांचा बार आहे.  उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय श्रीधर मिठारी (५१) रा. माधवनगर यांना या बारकडून तीन महिने हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी शिपाई बालाजी उत्तम राठोड (२७) याच्यासोबत मिळून बारच्या गोदामातील दारू तपासली. त्यात अनियमितता दिसल्याने गेल्या तीन महिन्यासाठी प्रती महिना ३ हजार रुपये असे नऊ हजार रुपये व शिपायाचे प्रत्येकी एक असे ३ हजार रुपये, असे एकूण १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्याकरिता बार व्यवस्थापकाला त्रास देणे सुरू झाले. पण, नागपुरातील एसीबी कार्यालयाकडून उत्पादन शुल्क विभागावर कारवाई होत नसल्याने बारच्या मालकाने थेट एसीबीच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली. त्यांनी प्रभारी अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर सापळा रचून उत्पादन मिठारी व राठोड यांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईने उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणला आहे. एसीबीच्या वरदहस्तामुळेच उत्पादन शुल्कातील विभागाचा भ्रष्टाचार सुरू असल्याची तक्रार आता बारमालक करू लागले आहेत. या तक्रारी बघता उत्पादन शुल्क विभागात एसीबीच्या कारवाईची आकडेवारी गोळा केली असता १९९७ पासून आतापर्यंत केवळ ६ कारवाया झाल्या आहेत. मिठारी याच्यावरील ही सातवी कारवाई आहे. २०१६ मध्ये गोंदिया येथे  उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर लाचेविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून २०१९ पर्यंत कारवाई झाली नव्हती. यावरून दोन्ही विभागातील लागेबांधे सहज लक्षात येऊ शकते.

बारच्या इमारतीत प्रतिकार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र कार्यालय आहे. त्या ठिकाणी अधीक्षक, निरीक्षक व उपनिरीक्षक असे सर्व अधिकारी बसतात. मिठारी याच्याकडे उमरेड व हिंगणा परिसराची जबाबदारी होती. परंतु आर्थिक व्यवहार करण्यासाठी मिठारीने हिंगणा परिसरातील एका बारच्या इमारतीमध्ये स्वत:चे प्रतिकार्यालय स्थापले होते. त्या इमारतीवर उत्पादन शुल्क विभागाचे फलकही लागले होते. पण, एसीबीच्या कारवाईनंतर ते फलक हटवण्यात आले. त्यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही.

घराची झडती, पण अपसंपदेची माहिती नाही

मिठारीवर कारवाई केल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली. या कारवाईला सहा दिवस उलटले तरीही एसीबीकडे पुरेशी माहिती नाही. तपास अधिकारी गणेश कदम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी केवळ काही दागिने सापडले असून उर्वरित संपत्तीची अद्याप माहिती गोळा केली नसल्याचे सांगितले. मिठारी याने बरीच अपसंपदा गोळा केली असताना एसीबीकडून त्या संपत्तीचा शोध का घेण्यात येत नाही, हा खरा प्रश्न असून मिठारीकडे तीन मोबाईल असताना तेही जप्त करण्यात आलेले नाही.

उत्पादन शुल्क विभागावर एसीबीचा वरदहस्त नाही. तक्रारदार समोर आले तर कारवाई करण्यात येते. आम्ही कारवाईला तयार आहोत. पण, बारमालक एसीबीकडे येत नाहीत. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागातील कारवाईचे प्रमाण कमी आहे. बारमालक तक्रार देण्यास समोर आल्यास कारवाई करण्यात येईल.

– श्रीकांत धिवरे, प्रभारी अधीक्षक, एसीबी नागपूर.

Story img Loader