नागपूर : एखाद्या प्रकरणात आरोपीला जामीन कसा मिळतो याचे कारण विचारले तर ते कारण काय असू शकते? कायदेशीर कारणांच्या पलीकडे कधी आरोग्याचे कधी मानवीय कारण असू शकते. मात्र, नागपुरातील एका प्रकरणात आरोपीच्या शर्टाचा रंग काय होता या बाबीवरून आरोपीला जामीन मंजूर करण्यात आले. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात एका आरोपीला अटक करताना आरोपीने कोणत्या रंगाचा शर्ट परिधान केला होता याबाबत संभ्रम असल्यामुळे एनडीपीएस न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला. विशेष एनडीपीएस न्यायालयाचे न्यायाधीश प्रमोद एम. नागलकर यांनी हा निर्णय दिला.

पिवळा रंग झाला काळा

आरोपीला अटक करताना त्याने पिवळ्या रंगाचा शर्ट घातला असल्याची माहिती पोलिसांनी सादर केली तर वृृत्तपत्रात आरोपी काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आणि आरोपीचा जामीन मंजूर केला. प्रशांत विश्राम चुटे असे या आरोपीचे नाव आहे. त्याला २३ जानेवारी २०२५ रोजी ४.२३० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत सरकारी पक्षाने जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. मात्र, आरोपीचे वकील गिरीश कुंटे यांनी न्यायालयाला तपासातील विरोधाभास लक्षात आणून दिला.

पोलिसांनी चुटेवर कारवाई केली तेव्हा त्याने पिवळ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट घातला होता, अशी नोंद पोलिसांच्या कागदपत्रांत आहे. मात्र, याच कारवाईबाबत एका वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीतील छायाचित्रानुसार या कारवाईतील आरोपी हा पिवळा नाही तर काळ्या रंगाचा शर्ट घालून उभा असल्याचे दिसून येते. त्यामुळे न्यायालयाने आरोपीच्या वर्णनातील विरोधाभास लक्षात घेतला. तसेच या प्रकरणाचा तपासही पूर्ण झाल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले गेले.

आरोपीवर एनडीपीएस कायद्याचे कलम ३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात जामीन देण्याबाबत कठोर नियम आहेत. मात्र, या प्रकरणातील परिस्थिती या कलमासाठी सुसंगत नसल्याने अखेर न्यायालयाने चुटेच्या बाजुने निकाल दिला. त्याला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटींसह जामीन मंजूर करण्यात आला. १९८५ मध्ये एनडीपीएस कायदा तयार करण्यात आला.

यात ड्रग्ज आणि तस्करीसारख्या गुन्ह्यांविरोधात शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यातील अनेक तरतुदी ड्रग्जचं उत्पादन, विक्री, बाळगणे, सेवन, तस्करी अशा कृतींचा समावेश आहे. याला केवळ परवानगीने वैद्यकीय किंवा वैज्ञानिक कारणांसाठी वापर अपवाद ठेवण्यात आला आहे.

Story img Loader