नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान झाल्यावर पंचवीस दिवसांनंतर भारतीय जनता पक्षाने जिल्हाधिकारी व मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेऊन मतदार यादीतून पाच लाखांहून अधिक नावे गहाळ झाल्याचा दावा केला. यादीतील घोळ दूर करून विधानसभा निवडणुकीपर्यंत ही यादी अचूक तयार करावी, अशी मागणी केली.
नागपूरमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान झाले. मतदार यादीत नावे नसल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. हा मुद्दा मतदानानंतर गाजला होता. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी यासाठी जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरले होते. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान मंगळवारी भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांना भेटले व त्यांना निवेदन दिले. लोकसभा निवडणुकीपूर्वी बीएलओ तसेच आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदार यादीतील नावांची पडताळणी करून सुधारित मतदार यादी तयार करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अनेक जण यादीत नावे नसल्याने मतदान करू शकले नाहीत. यासाठी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत अशा प्रकारच्या चुका होऊ नये, असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. पूर्व नागपूरमधील एका बुथची माहिती घेतली असता तेथील ३०० मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली, असे खोपडे यांनी कळविले आहे.
हेही वाचा – चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, बल्लारपूर तालुक्यातील घटना
जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात सेतराम सेलोकर, प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी, माजी नगरसेवक मनीषा धावडे, गजानन अंतूरकर, सुनील सूर्यवंशी, गुड्डू पांडे, एजाजभाई व इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
हेही वाचा – सोन्याच्या नाण्यांचा मोह नडला…नागपूरच्या इसमाला नऊ लाखांचा गंडा….
केंद्रावर अपुऱ्या सुविधा
१९ एप्रिलला मतदानाच्या दिवशी अनेक केद्रांवर उन्हात मतदार उभे होते. त्यांच्यासाठी मंडप किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रशासनाकडून करण्यात आली नव्हती. एका शाळेत सहा ते सात मतदान केंद्र असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, याकडे खोपडे यांनी लक्ष वेधले.