नागपूर : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) शरीराची चिरफाड न करता (व्हर्च्युअल ऑटोप्सी) शवविच्छेदनाचा एक पथदर्शी प्रकल्प सुरू आहे. त्याचे यश बघता नागपूर एम्समध्येही या पद्धतीने शवविच्छेदन केले जाणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनीही त्याबाबत सूचना केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास व त्याबाबतची तक्रार पोलिसात दाखल असल्यास नियमानुसार शवविच्छेदन केले जाते. परंतु, मृत्यूचे कारण आधीच स्पष्ट असल्यास मृताच्या शरीराची चिरफाड न करता शवविच्छेदन दिल्ली एम्सला केले जाते. उदा: एखाद्या व्यक्तीचा गोळी लागून मृत्यू झाल्यास त्याचे सीटी स्कॅन, एमआरआय काढले जाते. त्यातून ही गोळी शरीरातील कोणत्या मार्गातून कुठे गेली, कोणत्या अवयवांना इजा झाली, किती रक्तस्त्राव झाला आदी कारणे स्पष्ट होतात.

हेही वाचा…शहरी भागांत विकास, ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष; उपराजधानीत पायाभूत सुविधांचा विस्तार; संत्री उत्पादकांना फटका

हृदयविकाराने मृत्यू झाल्यास सीटी एन्जिओग्राफी केली जाते. त्यातून मृत्यूचे कारण स्पष्ट होत असल्याने शरीराची चिरफाड करावी लागत नाही. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी नागपूर एम्सला नुकतीच भेट दिली होती. त्यांनी येथेही या पद्धतीने शवविच्छेदन करण्याची सूचना केली. त्यानुसार नागपूर एम्सकडून प्रक्रिया सुरू आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय न्यायवैद्यक परिषदेतही याबाबत दिल्ली एम्सचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक यादव यांनी माहिती दिली होती.

नवीन पद्धतीचे फायदे काय?

शवविच्छेदनाच्या या नवीन पद्धतीमुळे न्यायवैद्यकशास्त्रच्या डॉक्टरांचे श्रम व वेळ वाचेल. मृतदेह लवकर नातेवाईकांना सोपवता येईल.

हेही वाचा…“गडचिरोली शेवटचा नव्हे राज्यातील पहिला जिल्हा,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; म्हणाले…

दिल्ली एम्समध्ये शवविच्छेदनाची (व्हर्च्युअल ऑटोप्सी) पद्धती वापरली जाते. ती नागपूर एम्समध्ये सुरू करण्याबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सूचना केली आहे. त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे. – डॉ. मनीष श्रीगिरीवार, वैद्यकीय अधीक्षक, एम्स, नागपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur aiims to set up virtual autopsy without cutting the body mnb 82 psg