नागपूर : विदर्भासह मध्य भारताच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम गतीने करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृतिगट स्थापन करण्यात आला असून प्रलंबित कामासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा राज्य शासनाने प्राधान्यक्रमाने हाती घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे मिहान इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विमानतळ विस्तारीकरणाबाबत मिहान इंडियाच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली.

हेही वाचा : उपराजधानीत तोतया पोलिसांचा सुळसुळाट, अजनी पोलीस ठाण्यासमोरच…

भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत असलेल्या नागपूर विमानतळाला मिहान इंडिया लिमिटेड कंपनीला हस्तांतरित करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता लवकर मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. त्याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. भारतीय वायुसेनेच्या स्थलांतरित जागेवरील रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याबाबतही या बैठकीत कालमर्यादा आखून देण्यात आली.

एकदा काम सुरू केल्यानंतर पुढे कुठल्याही प्रकारची अडचण जाऊ नये यादृष्टीने ज्या काही गोष्टी प्रलंबित आहेत त्याची एक महिन्याच्या आत पूर्तता करून कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचे निर्देश इटनकर यांनी दिले. विस्तारित विमानतळ प्रकल्पाच्या कामामध्ये अडथळा ठरणाऱ्या सुमारे एक किलोमीटर लांबीच्या उच्चदाब विद्युत वाहिनीचे स्थलांतर कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी दिले.

या बैठकीला मिहान इंडिया लिमिटेडचे संचालक अनिलकुमार गुप्ता, जीएमआरचे कार्यकारी संचालक एस.जी.के. किशोर, भारतीय वायुसेनेचे स्टेशन कमांडर शिव कुमार, पोलीस उपायुक्त लोहित मतानी, वरिष्ठ विमानतळ संचालक आबिद रुही, एमएडीसीचे प्रकाश पाटील, मुख्य अभियंता एस.के. चटर्जी, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या समन्वय प्रमुख लॅली मेरी फ्रान्सिस, महानगर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद गावंडे, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?

शिवणगावमधील अतिक्रमण काढणार

शिवणगाव येथील अतिक्रमण गतीने काढण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. पर्यायी गावठानात रितसर जागा बहाल करूनही जे लोक स्थलांतरित झाले नाहीत त्यांचे तत्काळ स्थलांतर केले जाणार आहे. सर्व विभाग प्रमुखांची या प्रकल्पाला गती देण्यासाठी महिन्यातून किमान दोन वेळा व गरज पडेल तशी बैठक बोलावून तत्काळ निर्णय घेतले जातील, असे इटनकर यांनी स्पष्ट केले.

खाजगी वाहतुकीला प्रतिबंध

विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पांतर्गत अधिसूचित क्षेत्रातून खाजगी वाहतूक पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महापालिकेची आपली बस आता विमानतळाच्या जागेतून जाणार नाही. महापालिकेला याबाबत कळवण्यात आले.

हेही वाचा : थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण

“कोणत्याही परिस्थितीत प्रशासकीय पातळीवरची प्रलंबित कामे मुदतीपूर्व पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले.”

डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी व अध्यक्ष, मिहान इंडिया लि.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur airport expansion administration on action mode to complete the work mihan india limited cwb 76 css