नागपूर : अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद स्मारक परिसरातील पूलाच्या रुंदीकरणाचे कार्य सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यामार्फत हे काम केले जात आहे. यासाठी अंबाझरी टी-पॉईंट ते स्मारकापर्यंतची दुहेरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दोन्हीकडील वाहतूक बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या एका बाजूची वाहतूक १५ ऑगस्टपर्यंत सुरू करणार असल्याची ग्वाही दिली होती. मात्र विभागाने आता ही ‘डेडलाईन’ ३० सप्टेंबर केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत सोमवारी उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले. विभागाच्यावतीने मुदतवाढीबाबत माहिती दिल्यावर न्यायालयाने प्रशासनाची कानउघाडणी केली. रस्ता बंद असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची पर्वा आहे की नाही? अशा शब्दात न्यायालयाने कामात होणाऱ्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रानुसार, १२ मार्च २०२४ रोजी पूलाच्या रुंदीकरणाचा कार्यादेश काढण्यात आला. या पूलाच्या बांधकामासाठी एक वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यानुसार ११ मार्च २०२५ रोजी संपूर्ण पूलाचे बांधकाम होणार आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वातंत्र्यदिनापर्यंत पुलाच्या एका बाजूने वाहतूक सुरू करण्याचे आश्वासन न्यायालयात दिले होते. विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत ही डेडलाईन ठरविण्यात आली होती. यानुसार संबंधित रस्त्यावरील दोन्ही बाजूची बंद करण्यात आली. मात्र आता सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या डेडलाईनमध्ये कार्य पूर्ण न होणार असल्याची माहिती दिली. पुलाच्या बांधकामात अनेक आव्हाने आहेत. उत्तम दर्जाचा पूल तयार करण्यासाठी अधिक वेळ लागेल, असे विभागाने सांगितले.
हेही वाचा – गडचिरोली : आयएएस शुभम गुप्ता यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करा, अन्यथा….
हेही वाचा – बुलढाणा तालुक्यात कोसळधार; घरे, दुकानांत पाणी शिरले… पिकांचीही नासाडी
विभागाच्यावतीने पुलाच्या रुंदीकरणात येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तरपणे माहिती दिली आहे. पुलाच्या शेजारी ११ किलोव्हॉटची विजेची तार गेली आहे. रुंदीकरण करण्यासाठी विजेचे तार हलविण्याचे कार्य ४ जून रोजी पूर्णत्वास आले. याशिवाय पूलाच्या परिसरात काही वृक्ष तोडण्याची आवश्यकता आहे. यासाठी महापालिकेने १९ जून रोजी परवानगी दिली. संबंधित भागात कठीण स्वरुपाचे खडक असल्याने कार्यात अडचणी येत आहेत. दुसरीकडे, पावसाळा सुरू झाल्यामुळे कुशल कामगार आपल्या गावांकडे परतले आहेत. याचा फटका निर्माण कार्याला बसलेला आहे, अशी माहिती विभागाने न्यायालयात शपथपत्रात दिली.