लोकसत्ता टीम
नागपूर: आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे २२ सप्टेंबर २०२३ ला नागपुरात अतिवृष्टी झाली.गौरी- गणपतीचे दिवस होते. घरोघरी उत्सवी वातावरण होते. पाऊस सुरू होता. रात्री त्याचा जोर वाढला, गौरी, गणपतीची पुजा आटोपल्यावर नागरिक झोपी गेले. मध्यरात्रीनंतर तीन वाजताच्या सुमारास अचानक लोकांना जाग आली. बघता बघता संपूर्ण घर पाण्यात बुडतं की काय? इतके पाणी घरात शिरले होते. अंबाझरी तलाव फुटला अशी अफवा पसरली होती. सर्वत्र हाहाकार उडाला होता. काय करावे सुचत नव्हते. ते चित्र आजही आठवले की काळजात धडधड वाढते. आत्ताही ढगांचा कडकडाट सुरू झाला की लोक भयग्रस्त होतात.
अंबाझरी लेआऊट या पूरबाधित वस्तीतील ज्येष्ठ नागरिक गजानन देशपांडे एक वर्षापूर्वीच्या महापुराचा आंखोदेखा हाल सांगत होते. निमित्त होते अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने आलेल्या महापुराच्या वर्षपूर्तीचे.
आणखी वाचा-अकोला : “शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रयत्न करू,”आमिर खानची ग्वाही
अंबाझरी तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाल्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीला सोमवारी २३ सप्टेंबर २०२४ ला एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्षाआधी याच दिवशी अंबाझरी लेआऊट, त्यालगतच्या वस्त्यांमध्ये आलेल्या पुराचे चित्र नजरेआड होत नाही. थोडासाही पाऊस आला, ढगांचा कडकडाट झाला की काळजात धस्स होते. एक वर्षापूर्वी पुरामुळे वस्त्यांमधील हजारो कुटुंबांची झालेली वाताहात आठवते. रात्री पाऊस झाला की अनेक जण वरच्या मजल्यावर मुक्काम हलवतात. अनेकांनी यंदाचा पावसाळा इतरत्र घालवला. काहींनी सामानसुद्धा दुसरीकडे हलवले. भीती अजूनही कायम आहे. वर्षभराच्या काळात पुराने वाहून गेलेले रस्ते दुरुस्त झाले, बाजूने वाहणारी व पुरासाठी कारणीभूत ठरलेल्या नागनदीतील गाळ काढण्यात आला. अतिक्रमणही हटवण्यात आले. थातूरमातूर का होईना नदीची संरक्षक भिंत बांधली, टिनाचे पत्रे मात्र कोसळले. तलावाच्या बळकटीकरणाचे काम सुरू झाले. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना म्हणावी का असा प्रश्न पडतो. कारण ज्या कारणांमुळे पूर आला ती अद्यापही कायम आहे.
काय झाले होते २३ सप्टेंबर २०२३ ला?
२३ सप्टेंबर २०२३ रोजी गणपती, गौरीचे पूजन करून निद्रिस्त झालेल्या अंबाझरी तलावालगतच्या वस्त्यांमधील नागरिकांना मध्यरात्रीनंतर ३ वाजता खडबडून जाग आली तीच मुळी त्यांच्या घरात शिरलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे. सरकारी यंत्रणेला कळवूनही ती नेहमीप्रमाणे उशिरा हलली. एनडीआरएफ, एसडीआरएफचे जवान बोटींसह दाखल झाले. पण, त्यांच्याकडे डिझेल नव्हते. त्यांना नागरिकांची मदत करणे सोडून डिझेलसाठी पेट्रोल पंपावर धाव घ्यावी लागली. तेथेही शासनाच्या नियम आडवा आला. डबकीत डिझेल देण्यास पंपावरील कर्मचाऱ्यांनी नकार दिला. कोणीतरी मध्यस्थी केल्यावर अखेर डिझेल मिळाले. तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. कारण, पाण्याची पातळी सातत्याने वाढतच होती. घरोघरी नागरिक, वृद्ध अडकले होते. अखेर वस्तींमधील तरुणांनीच वृद्धांना सुरक्षित स्थळी हलवले.
आणखी वाचा-बुलढाणा : ‘लाडक्या बहिणीं’मुळे अन्न, उष्टावळ्यांचा खच; भावांकडून मैदानाची स्वच्छता
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा
सजग आहे का?२३ सप्टेंबर २०२३ ला पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळातच अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला होता. पावसाचा जोर वाढत असताना आणि तलावातून विसर्गाचे प्रमाण वाढत असताना परिसरात पूरस्थिती निर्माण होईल हे प्रशासनाला कळले नसेल का? त्यांनी या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा का दिला नाही? याचे उत्तर एक वर्षानंतरही मिळाले नाही.
पुराच्या कारणांचा शोध
सरकारी सेवेतून उच्चपदावरून निवृत्त झालेल्या पूरबाधित वस्त्यांमधील काही नागरिकांनी पुराच्या कारणांचा शोध सुरू केला. अनेक वर्षांपासून तलावातील गाळ न उपसणे, चुकीच्या ठिकाणी विवेकानंदाचे स्मारक बांधणे, तलावातील पाण्याचा प्रवाह अडणे, पाणी वाहून नेणारा पूल अरुंद असणे, क्रेझी केसलमध्ये नदीच्या पात्रावर अतिक्रमण करणे या व अशाच प्रकारच्या अन्य कारणांमुळे वस्त्यांमध्ये पाणी शिरले हे स्पष्ट झाले. एनआयटीचा भूखंड क्रेझी केसल या जलक्रीडा केंद्रासाठी भाडेतत्त्वावर देऊन त्यावर कोणतीच देखरेख ठेवली नाही. क्रेझी केसल व्यवस्थापनाने त्याचा फायदा घेत व्यावसायिक फायद्यासाठी नागनदीच्या पात्राची रुंदी १८ मीटरवरून ९ मीटर इतकी कमी केली. हीच बाब पुरासाठी कारणीभूत ठरली. एक वर्षात महापालिका प्रशासनाने नदीपात्रातील अतिक्रमण दूर करून नदीचा प्रवाह मोकळा केला. नागरिकांनी अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून प्रशासनाचे दरवाजे ठोठावणे सुरू केले. त्यानंतर अनेक बाबी उघड झाल्या.