काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी हे निधी वाटपाच्या मुद्यावरून नागपूर महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करीत असल्याची ध्वनिफीत (ऑडिओ क्लिप) समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली. मात्र, वंजारी यांनी या ध्वनिफीतमधील आवाज आपला नसल्याचे म्हटले आहे.
वंजारी हे निधी खर्च करण्याबद्दल एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करीत असल्याची ध्वनिफीत भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात येत आहे. तर, भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे वंजारी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याची मागणी केली.
या ध्वनिफीतमध्ये वंजारी हे चव्हाण नावाच्या कार्यकारी अभियंत्यांचे नाव घेऊन शिवीगाळ करीत आहेत. निधीला कोणीही हात लावू शकत नसल्याचे सांगून, असे करण्याची कोणाची हिंमत नाही, असेही संबंधित अधिकाऱ्याला म्हणत आहेत.
याप्रकरणी वंजारी यांच्याशी संपर्क साधला असता या ध्वनिफीतमधील आवाज आपला नसल्याचे त्यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. तर ज्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली आहे, त्यांच्याकडूनही यासंबंधी कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.