नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण विदर्भाला हुडहुडी भरली आहे. किमान तापमानात वेगाने घट होत आहे. अवघ्या २४ तासात नागपूरच्या तापमानात १.७ अंश सेल्सिअसने घट झाली असून ते ११.६ अंश सेल्सिअसवर आले. अमरावती शहराचे तापमान २.४ अंश सेल्सिअसने कमी होऊन ते १०.८ अंश सेल्सिअसवर आले. यवतमाळ आणि गोंदिया शहरातही तीन आणि एक अंश सेल्सिअसने पारा घसरला आहे. दरम्यान, थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
नोव्हेंबरच्या उत्तरार्धात वातावरणात अचानक बदल होऊन थंडी जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वेगाने घट होत असून हवेतील गारठा देखील वाढला आहे. या आठवड्यात नागपूरसह विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान १५-१६ अंश सेल्सिअसवरुन दहा अंश सेल्सिअसपर्यंत येऊन पोहोचले आहे. पश्चिमेकडील कोरडे वारे विदर्भाच्या दिशेने वाहत असतानच जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील पहाडी भागांत सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे वातावरणातील गारठा वाढला आहे.
हेही वाचा: वाघांच्या अवयवाची तस्करी; १५ नखे, तीन सुळे, दहा दात व पाच किलो हाडे जप्त
आठवडाभरापासून सायंकाळी थंडी जाणवू लागली होती. आठवडाअखेरीस दिवसा देखील थंडी जाणवत आहे. त्यामुळे गरम कपड्यांची गरज आता रात्रीच नाही तर दिवसादेखील जाणवत आहे. रात्रीच्या शेकोट्या पेटण्यास देखील सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने कळवले आहे.