नागपूर : वन्यप्राण्यांच्या शिकारीचा गुंता अजूनही सुटायला तयार नसून तृणभक्षी प्राण्यांच्या शिकारी सातत्याने होत आहेत. मात्र, त्याचबरोबर वाघ आणि बिबट्याच्या शिकारीचा विळखा देखील घट्ट होत आहे. नागपूर व वडसा वनखात्याने केलेल्या संयुक्त कारवाईत बिबट्याच्या कातडीसह ११ नखे जप्त करण्यात आली. तसेच या प्रकरणी तीन आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले.
बिबट्याची शिकार करुन त्याचे अवयव वेगवेगळे करुन तस्करी होत असल्याची माहिती नागपूर वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे वडसा वनविभागासह संयुक्त पथक तयार करुन सापळा रचण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून या पथकातील वनखात्याचे अधिकारी बनावट ग्राहक बनून वन्यजीव तस्करांच्या संपर्कात होते. वनतस्करांकडून चाचणी झाल्यानंतर विस्तृत माहिती गोळा करुन वडव वनविभागाच्या पथकाला देण्यात आली. त्यानंतर कारवाईची आखणी करुन गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील रामगडचे रहिवासी विनायक टेकाम, मोरेश्वर बोरकर, मंगलसिंग मडावी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी व ११ नखे जप्त करण्यात अलो. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये आरोपींवर वनगुन्हा नोंदवण्यात आला. या तिन्ही आरोपींना बुधवारी कुरखेडा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उपस्थित करण्यात आले.
हेही वाचा… नागपूर विधान परिषद निवडणुकीसंदर्भात संभाजी ब्रिगेडचा मोठा निर्णय, कुणाला जाहीर केला पाठिंबा?
हेही वाचा… चंद्रपूर : तेलंगणा-महाराष्ट्र सीमावर्ती भागात धुमाकूळ घालणारा बिबट जेरबंद
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, गडचिरोली वनसंरक्षक किशोर मानकर, उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक धर्मवार सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनात विभागीय वनाधिकारी पी.जी. कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे, बी.एच. दीघोळे, क्षेत्र सहाय्यक . ककलवार, वनरक्षक तवले, पडवळ, जाधव, शेंडे यांनी सापळा यशस्वी केला. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण करीत आहेत.