नागपुरात पोलिसांनी अटक केलेला आरोपी चक्क पोलीस व्हॅनमध्ये बसून डायलॉगबाजी करत असल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. आरोपी पोलीस व्हॅनच्या बाहेर उभ्या आपल्या मित्रांसोबत बोलत असताना ही डायलॉगबाजी करत होता. विशेष म्हणजे पोलीस यावेळी तिथेच उभे होते. या व्हिडीओनंतर आरोपींवर पोलिसांचा वचक आहे की नाही याबद्दल चर्चा सुरु आहे.
पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या लक्षीकारी बाग परिसरात १३ नोव्हेंबरच्या रात्री दोन गटातील वादातून रोहन बिऱ्हाडे या गुन्हेगाराचा मृत्यू झाला होता. परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वीरेंद्र रामगडिया, अश्विन इंदूरकर आणि येशुदास परमार यांनी रोहनची हत्या केली. पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटकही केली. पोलीस कोर्टात हजर करण्यासाठी त्याला घेऊन गेले असता वीरेंद्र पोलीस व्हॅनमधूनच साथीदारांना भेटला.
यावेळी त्यांच्यातील एकाने वीरेंद्रला डायलॉग म्हणण्यास सांगितले. यावर त्याने ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’, ‘बादशाह बोलते चाकू मारते’ असा डायलॉग मारला.
यावेळी त्याने आपल्या साथीदारांना तुरुंगातून आल्यानंतर ५० लाखांची टीप मिळेल असं सांगितल्याचंही व्हिडीओत ऐकू येत आहे. त्यानतंतर एका साथीदाराने खर्रा वैगैरे गोष्टी मिळवण्याबद्दल विचारलं असता त्याने सर्व गोष्टी मिळाल्या आहेत असं उत्तर दिलं. तसंच मला नवं जॅकेट मिळालं असते तर बरं झाले असतं असं सांगताना दिसत आहे.
वीरेंद्रच्या सहकाऱ्यांनीच हा व्हिडीओ शूट केला होता. त्यामुळे त्यांनीच हा व्हिडीओ व्हायरल केला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.