नागपूर : सोमवार २४ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महामेट्रो मेट्रो गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करत दर १० मिनिटांनी प्रवासी फेऱ्या सुरू केल्या. त्याचाच फायदा होताना दिसत असून पहिल्याच दिवशी मेट्रोची प्रवासी संख्या ९० हजारावर गेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारपासून दर दहा मिनिटांनी मेट्रो गाड्या सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. पहिल्या दिवशी मेट्रो प्रवासी संख्या ९३,१०३ एवढी होती. जी मागील आठवड्याच्या तुलनेत ४२ टक्क्याने वाढली. प्रवासी संख्या वाढावी या करता महामेट्रोतर्फे सर्वंकष होणाऱ्या प्रयत्नांचेच हे फलित आहे
नागपूर मेट्रोने तिकीट दरात ३३ टक्केपर्यंत कपात केली. तसेच, विद्यार्थ्यांना महाकार्डवर मिळणारी ३० टक्के सवलत कायम ठवली. त्यामुळे भाडे कपात निम्म्यावर आली. त्यासोबतच मेट्रो ट्रेनमध्ये (कुठलेही अतिरिक्त भाडे न घेता) सायकल सोबत घेऊन जाण्याची परवानगी देते. त्याचाही फायदा विद्यार्थांना होतो. महामेट्रोने नुकतीच व्हॉट्सअ‍ॅप तिकीट सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचत नाही तर यामुळे तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज उरली नाही. तिकीट खरेदीकरिता महामेट्रोने अनेक पर्याय दिले आहेत. त्यात तिकीट खिडकीसह तिकीट व्हेंडिंग मशीन, तिकीट बुकिंग अ‍ॅप, महाकार्ड (१० टक्के सवलत), विद्यार्थी महाकार्ड (३० टक्के सवलत) समावेश आहे.

हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर, नाशिक व नागपूर शहर गोव्याला हवाई मार्गाने जोडणार, शक्तिपीठ महामार्ग तूर्तास थंडबस्त्यात

२४ जून (सोमवार) पासून नागपूर मेट्रोच्या खापरी, ऑटोमोटिव्ह चौक, प्रजापती नगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन या चारही टर्मिनल स्टेशनवरून मेट्रो सेवा सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान दर १० मिनिटांनी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ज्याचा फायदा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच कार्यालयीन कर्मचारी, व्यापारी आणि व्यावसायिक वर्गाला देखील होत आहे.

हेही वाचा – “नो काँगेस, नो भाजपा, ओन्ली रिपब्लिकन”; संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या बैठकीत…

मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. नागपूर मार्गावर सध्या खापरीपर्यंत मेट्रो धावते, दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर ती बुटीबोरीपर्यंत धावणार आहे. त्यामुळे बुटीबोरी एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सोयीची ठरेल. सध्या वर्धा मार्गावर वाहतुकीची वर्दळ असते. अनेक अपघात या मार्गावर होतात. मेट्रोची सेवा बुटीबोरीपर्यंत सुरू झाल्यास सध्या बस किंवा खासगी वाहनांनी प्रवास करणारे प्रवासी मेट्रोला पसंती देऊ शकतात. सध्या खापरी रेल्वेस्थानकाहून मिहान, एम्ससाठी फीडर सेवा महामेट्रोने सुरू केली आहे. एम्समध्ये जाणाऱ्या रुग्णांची यामुळे सोय झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur as the schedule changes the number of metro passengers increases cwb 76 ssb