नागपूर : पती-पत्नी आणि मुलगी असा छान त्रिकोणी आनंदी संसार सुरू असताना अचानक पत्नीला कर्करोगाचे निदान झाले. गावात उपचाराला मर्यादा होत्या म्हणून हे कुटुंब केरळातून नागपूरला आले. उपचार सुरू झाला. पण, आजार गंभीर आणि खर्च जास्त. होते नव्हते ते सारे पैसे संपले. पत्नीच्या तोंडातून रक्त वाहू लागले. तिची वेदना पाहवेना. अखेर तिघांंनीही हे जगच सोडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जहाल विष प्राशन केले. यात दाम्पत्याचा मृत्यू झाला आणि मुलगी मृत्यूशी संघर्ष करतेय.
ही दुर्दैवी घटना शुक्रवारी नागपुरात उघड झाली. रिजू विजयन ऊर्फ विजय नायर (४०), प्रिया रिजू नायर (३४) असे मृत पती-पत्नीचे तर वैष्णवी नायर (११) असे अत्यवस्थ मुलीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे कुटुंब मूळ केरळचे. विजय हा रंगरंगोटीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. विजय आणि प्रिया यांनी प्रेमविवाह केला होता. दोघांना एक ११ वर्षीय सुंदर मुलगीही आहे.
हेही वाचा…राज्यात अकोल्यासह सात जिल्ह्यांत एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय, ९२ नवीन पदांची…
आयुष्य आनंदात सुरू असताना प्रियाला रक्ताचा कर्करोग झाला. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी नागपुरातील किंग्जवे हे खासगी रुग्णालय गाठले. येथे दीर्घकाळ उपचार चालणार असल्याचे सांगण्यात आल्यावर त्यांनी जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत खोली भाड्याने घेतली. महागडे इंजेक्शन नियमित लावावे लागत होते. सुरुवातीला गावाकडून नातेवाईकांमार्फत पैसे आले. परंतु काही दिवसांपासून हा ओघ कमी झाला. पैसे संपल्याने उपचार घेणे कठीण झाले. अखेर ४ जुलैला दोघांनीही आपल्या मुलीसह घरात विष घेतले. घरातून सकाळपासून कुणाकडूनही प्रतिसाद नसल्याने शेजाऱ्यांनी पाहिले असता तिघेही पडून असल्याचे दिसले. तातडीने त्यांना मेयो रुग्णालयात हलवण्यात आले. त्यात पती-पत्नीचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगी अत्यवस्थ आहे. पोलिसांनी त्यांच्या गावातील नातेवाईकांशी संपर्क साधला असून ते लवकरच नागपुरात पोहचणार आहेत.
हेही वाचा…Maharashtra Weather Update : हवामान खात्याने दिला पावसाचा इशारा, पण…
असह्य वेदना ते चिरनिद्रा…
प्रियाला आठवड्यातून एकदा १ हजार ७०० रुपयांचे इंजेक्शन घ्यावे लागत होते. परंतु, ते इंजेक्शन प्रियाला आर्थिक कोंडीमुळे घेता आले नाही. त्यामुळे तिच्या नाका-तोेंडातून रक्तप्रवाह सुरू झाला. तिला प्रचंड वेदना होत होत्या. दोघेही बापलेक हे असयतेने पाहत होते. काय करावे, पैसे कुठून आणावे, हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करीत होता. अखेर वेदना असह्य झाल्याने त्यांनी मिळून विष घेतले आणि या वेदनेतून कायमची मुक्तता करून घेतली. मुलगी मात्र मृत्यूशी संघर्ष करीत आहे.