Nagpur ASI Rajesh Paidalwar President Police Medal : लेखणीला तलवार व बंदुकीपेक्षा मोठं शस्त्र मानलं जातं. गेल्या अनेक दशकांमध्ये लेखणीमुळे जगभरात मोठी उलथापालथ झाल्याचं आपण पाहिलं आहे. अनेक देशांमध्ये सत्तांतरं झाली आहेत. अशाच लेखणीचा वापर करून एका पोलिसांने १,१०० हून अधिक गुन्हेगारांना तुरुंगात धाडलं आहे. बंदूक व काठी ही पोलिसांकडील शस्त्रं आपण नेहमी पाहतो. परंतु, एका पोलिसाने बंदूक व काठी बाजूला ठेवून लेखणीचा वापर करत शेकडो गुन्हेगारांना अद्दल घडवली आहे. या पोलिसाचं नाव आहे राजेश पैडलवार. ५६ वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षक राजेश पैदलवार (अलीकडेच त्यांची बढती झाली आहे. याआधी ते हेड कॉन्स्टेबल होते.) यांनी महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटीज (एमपीडीए) कायद्याची कडक अंमलबजावणी करून अनेक गुन्हेगार गजाआड केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमपीडीए कायद्याची अंमलबजावणी करून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मोठं योगदान देणाऱ्या राजेश पैडलवार यांची एमपीडीए कॉप (MPDA Cop) अशी नागपुरात ओळख झाली आहे. तसेच पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.

गुंड संतोष आंबेकर व त्याच्या टोळीविरोधात महाराष्ट्रात पहिल्यांदाच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लागू करण्यात आला होता. यामध्येही पैडलवार यांची महत्त्वाची भूमिका होती. संतोष आंबेकरला २००४ मध्ये MCOCA अंतर्गत शिक्षा झाली होती.

पैडलवार नेमकं काय करतात?

पैडलवार यांच्या प्रयत्नांमुळे एमपीडीए कायद्यांतर्गत ६०० हून अधिक गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे. तर MCOCA अंतर्गत ५०० गुन्हेगार गजाआड झाले आहेत. इतर ६० गुन्हेगारांना वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली तुरुंगाची वाट दाखवण्यात पैडलवार यांचा मोठा वाटा आहे. एखाद्या गुन्हेगाराविरोधातील खटला दाखल करताना कायद्यातील बारीकसारीक गोष्टींवर ते विशेष लक्ष देतात, उत्तम मसुदा तयार करतात. त्यांच्या रणनितीमुळे भक्कम खटला उभा करणं पोलिसांना शक्य होऊ लागलं आहे. याच कामामुळे ते पोलीस आयुक्त कार्यालयातील चर्चेतील व्यक्तीमत्त्व झाले आहेत. या विशेष कामामुळे पैडलवार यांचा विशेष महासंचालक चिन्ह देऊन यापूर्वी सन्मान करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Anjali Damania : “तुमचं राजकारण संपवणार”, अंजली दमानिया अजित पवार गटाबाबत मोठा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत; म्हणाल्या, “त्यांचं उत्पन्न…”

‘असा’ आहे पैडलवार यांचा प्रवास

पैडलवार म्हणाले, “मी आधी एका कारखान्यात काम करत होतो. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे मी नोकरी गमावली. त्यानंतर मी पोलिसांत भरती होण्याचा निर्णय घेतला. मी परीक्षा दिली आणि १९९१ मध्ये हवालदार म्हणून रुजू झालो. आधी पोलीस ठाण्यात व नंतरच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) सेलपासून सुरुवात केली. सेवानिवृत्त उपनिरीक्षक किशोर जोग हे माझे पहिले मार्गदर्शक होते. त्यांनी मुाझे मसुदे सुधारले, इंग्रजी सुधारलं. सुरुवातीच्या काळात आम्ही जे खटले चालवले, त्याअंतर्गत राजू वाद्रे व आंबेकरसारख्या गुंडांना वारंवार तुरुंगवाऱ्या कराव्या लागल्या. आमच्या खात्याला जे यश मिळालं, त्यात सर्वांचाच वाटा आहे. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यामुळेच हे शक्य झालं. कायदा सुव्यवस्था राखणं शक्य झालं.”

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur asi rajesh paidalwar president police medal for over 1100 criminals in jail asc
Show comments