नागपूर : महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही रामटेक, कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांना काँग्रेसकडून नोटीस बजाविण्यात आली होती. बंडाची तलवार म्यान करून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर करावा. तसे न केल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. त्यानंतरही अर्ज माघार न घेतलेल्या आणि बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली होती.
त्यानंतर सोमवारी पुन्हा २८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केलेल्या विविध मतदारसंघातील एकूण २८ जणांना काँग्रेस पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी ही माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच गॅरंटी आम्ही काल जाहीर केल्या आहेत. भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या गॅरंटी महत्त्वाच्या आहेत. १३, १६ आणि १७ नोव्हेंबरला प्रियंका गांधी महाराष्ट्रात येत आहेत.
मल्लिकार्जुन खरगे पाच दिवस महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. सुरुवातीला सहा पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री राजेंद्र मुळक, काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल, सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या जयश्री पाटील आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांना ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
हेही वाचा…गुजरातच्या ‘पटेलां’चे अमरावतीच्या निवडणुकीवर लक्ष !
विविध मतदारसंघातील या बंडखोरांवर कारवाई
आनंदराव गेडाम, शिलु चिमूरकर, सोनल कोवे, भरत येरमे, अभिलाषा गावतूरे, राजू झोडे, प्रेमसागर गणवीर, अजय लांजेवार, विलास रघुनाथ पाटील, आसमा जव्वाद चिखलेकर, हंसकुमार पांडे, कमल व्यवहारे, मोहनराव दांडेकर, मंगल विलास भूजबळ, मनोज शिंदे, सुरेश पाटीलखेडे, विजय खडसे, शबीर खान, अविनाश लाड आदींचा समावेश आहे.
जयश्री पाटलांवरही कारवाई
लोकसभेमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघात राज्यभर गाजलेला सांगली पॅटर्न आता विधानसभेतही कायम राहिल्याचे दिसून येत आहे. सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या वसंतदादा गटाने जयश्री पाटील यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्याला खासदार विशाल पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला. वसंतदादा कुटुंबात २०१४ नंतर तिकीट मिळाले नाही, आमची काय चूक झाली असा सवाल विशाल पाटील यांनी विचारला होता. काँग्रेसने आता जयश्री पाटील यांना निलंबित केले आहे.