नागपूर : उपराजधानीतील अखिल भारतीय आयुविज्ञान संस्था (एम्स) परिसरात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे (एमयूएचएस) आयोजित आदिवासींसाठीच्या आंतराष्ट्रीय परिषदेत तयार आदिवासींच्या गावात वनऔषधींचे सादरीकरण पारंपरिक वैद्यांनी केले आहे. त्यासाठी गडचिरोलीसह इतर दुर्गमभागातील वनऔषधींचा खजाना येथे आणण्यात आला आहे. या वनऔषधीवबाबत जाणून घेऊ या.

वनऔषधींसाठी विविध वनस्पतींचे निरनिराळे भाग (जसे मूळ, खोड, पान, फुले, बिया, साल, इ.) व त्यांपासून बनवलेले अर्क, काढे, रसायने, गोळ्या , लेप, तेल इत्यादी उपयोगात आणले जातात. आधुनिक औषध क्षेत्राकडून या औषधांवर आक्षेप घेण्यात येत असले तरी दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचा या औषधांवरच जास्त विश्वास आहे.

ही बाब लक्षात घेऊन एम्समधील आदिवासींच्या गावातील प्रदर्शनात या वनऔषधींचे सादरीकरण केले जात आहे. येथे गडचिरोलीसह देशातील इतरही काही भागातील एकूण १० वैद्य आले आहेत. चामोर्शीहून आलेले वैद्य नंदा चलाख म्हणाले, डुक्कर कंद हे मानवाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूपच लाभदायक आहे. या कंदाच्या चकती उकडून खातात. त्यामुळे पोट विकाराच्या रुग्णांना लाभ होतो. पित्ताशयातील खड्यावरही ते लाभदायक आहेत. तेलीया कंद हा कॅन्सर सदृश सूज, गाठीसाठी खूपच फायद्याचा आहे. परंतु हा कंद विषारी असतो. त्यामुळे हे कंत्र गोमुत्र वा तूपात भाजून विशिष्य पद्धतीने तयार करून रुग्णांना दिले जाते. खोकला व इतर आजारासाठी देवकंद आणि मधूमेहाच्या रुग्णांसाठी इन्सुलीन प्लांटचीही माहिती त्यांनी दिली. परंतु या औषधी बनवण्याची विशेष पद्धती असून त्याचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे असल्याचेही चलाख यांनी सांगितले.

दमा, खोकल्यासाटी वनऔषधी

कटेरिया (कटकारी) या काटेरी वृक्षाच्या रसाचा काढा खोकला, कफ दूर करतो. हा रस मधात सुंठ, मिरे मिसळून घेतल्यास फायदा होतो, असे चलाख यांनी सांगितले. तिनधारी स्नुई या वृक्षापासून तयार रसही दमा, खोकला, कफसाठी फायद्याचा आहे. परंतु तिनधारी स्नुईचे पान कनकीत गुंडाळून प्रथम भाजले जाते. त्यानंतर पानावर रस बाहेर येतो. त्या रसापासून विशिष्ट पद्धतीने औषध तयार करून दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रदर्शनाचा लाभ घ्यावा

“एम्समध्ये तयार करण्यात आलेल्या आदिवासींच्या गावात दुर्गम भागातील आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या वस्तू विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ठेवण्यात आल्या आहेत. वनऔषधींचेही सादरीकरण केले जात आहे. हे प्रदर्शन सगळ्यांसाठी खुले असून विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घ्यावा.” डॉ. मोहन येंडे, समन्वयक, आदिवासींचे गाव, एम्स.

Story img Loader