नागपूर : फिलिपिन्समध्ये अलिकडेच आशियाई मास्टर्स ॲथलेटिक्स अंजिक्यपद स्पर्धा पार पडली. यामध्ये नागपूरच्या खेळाडूंनी तीन सुवर्णपदक, दोन रौप्य आणि सहा कांस्यपदक अशी एकूण अकरा पदके जिंकली.स्पर्धेत २२ आशियाई देशातील खेळाडूंचा सहभाग होता. भारतीय खेळाडूंनी स्पर्धत सर्वाधिक ७० सुवर्णपदके, ६३ रौप्यपदके आणि ८२ कांस्यपदक प्राप्त केले. स्पर्धेत जपान द्वितीय क्रमांकावर तर यजमान फिलिपिन्स तिसऱ्या स्थानावर होते. स्थानिक खेळाडूंमध्ये सीमा अख्तरने दोन हजार मीटर स्टिपल चेस, १० किलोमीटर मॅराथॉन आणि ४०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्ण जिंकले. रेणू सिद्धूूने ८०० मीटर आणि पाच हजार मीटर शर्यत तसेच चार बाय १०० मीटर रिले शर्यतीत कांस्य जिंकले.
दोन हजार मीटर स्टिपलचेस, १० किलोमीटर शर्यतीत रेणूने रौप्य पदक पटकाविले. शारदा नायडू यांना उंच उडी आणि ८० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक मिळाले. अल्का पांडे यांनी तिहेरी उडीत कांस्य जिंकले. दत्ता सोनवले यांनी तीन हजार मीटर स्टेपल चेस स्पर्धेत आणि १० किलोमीटर शर्यतीत कांस्य जिंकले. याशिवाय अकरम खान, सुनील जाधव, पूर्णिमा कापटा, वंदना गायकवाड, शोभा राठोड, हेलन जोसेफ आणि कल्याणी चौधरी यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.