घराशेजारी राहणाऱ्या तरूणीचे अपहरण करून तिच्यावर रात्रभर सामूहिक अत्याचार करण्याची योजना दोन मित्रांनी आखली. योजनेनुसार तरुणीचे दुचाकीवरुन अपहरण केले आणि घरात नेऊन कोंडून ठेवले. काही वेळातच तरूणीने दोन्ही तरुणांना धक्का देऊन स्वत:ची सुटका केली. या प्रकरणी वाडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली. संदीप पंजाबराव रंगारी (३५) आणि मिलिंद विजय निकोसे (३४) दोन्ही रा. म्हाडा एलआयजी कॉलनी, वाडी अशी आरोपींची नावे आहेत.
पीडित तरुणीला वडील नसून आई आणि बहीण आहे. बहीण ही मुंबईत नोकरी करते. संदीप हा आयुध निर्माणी येथे कुकचे काम करतो तर मिलिंद हा स्कूल व्हॅन चालवितो. संदीप आणि या तरुणीचे एकमेकांच्या घरी येणेजाणे होते. चार महिन्यांपूर्वी पीडित तरुणी ही वाडी हद्दीतील एका दुचाकी शो रूममध्ये नोकरीला लागली. तिच्या घरापासून शोरूमचे कार्यालय दूर असल्याने तिने लाव्हा रोडवर एक खोली भाड्याने घेऊन ती तेथे राहात होती.
शनिवारी सायंकाळी ती आईच्या घरी जात असे. रविवारी दिवसभर ती आईकडे थांबली आणि रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या खोलीवर जाण्यास निघाली. वस्तीत राहणाऱ्या एका मुलाने तिला दवलामेठी येथील बसथांब्यावर आणून सोडले. बसथांब्यावर ती उभी असताना संदीप आणि मिलिंद हे दुचाकीने आले. त्यांनी तरुणीला घरी सोडतो असे सांगून दुचाकीवर बसण्यास सांगितले. मात्र तरुणीने दुचाकीवर बसण्यास नकार दिला. त्यावर त्यांनी बळजबरीने तिला दुचाकीवर बसविले आणि तिला घरी न सोडता लावा रोडवरून आदर्शनगरकडे घेऊन निघाले. तरुणीने त्यांना विचारणा केली असता दोन मिनिटाचे काम आहे असे सांगून तिला एका मित्राच्या घरी नेले. घरात नेल्यानंतर दार बंद केले आणि तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. नकार दिल्यास बलात्कार करण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांनीही तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने आरोपींना धक्का देऊन घरातून पळ काढला.