नागपूर : गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्येसुद्धा वाढ झाली. त्यामुळे महिला सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशीच एक घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. मध्यरात्री एका तरुणीच्या घरात घुसून एका आरोपीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. या प्रकरणी पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अवघ्या आठ तासांत आरोपीला अटक केली. अशाच प्रकारची घटना हुडकेश्वर, लकडगंज, नंदनवन परिसरात घडल्या. अलिकडेच ईमामवाडा पोलिस ठाण्याअंतर्गत तरुणीच्या वडिलांची हत्या झाली.

उपराजधानी सारख्या नागपूर शहरात घरात घुसून एखाद्या तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न होत असेल तर दुर्गम भागाचा विचार न केलेलाच बरा. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धडकेबाज मोहिम राबवित शेकडो आरोपींना अटक केली. अनेकांवर मोक्काची कारवाई केली. हजारो आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत बंधपत्र घेतले. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. एवढेच काय तर नशा मुक्त शहरासाठी ठिकठिकाणी उपक्रम राबवून तस्करांच्या मुसक्या आवळल्या. शहरात शांतता काय राहावी यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. मात्र, काही निष्क्रिय कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाते.

पारडी परिसरातील एका आरोपी तरुणाने घरात घुसून तरुणीवर जबरीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. अश्लील चाळे करून विनयभंग केला. विशेष म्हणजे घरात आई वडिल आणि भाऊ असतानाही त्याची हमत झाली. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. अमोल कडसूले (३६) रा. पारडी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी विवाहित असून तो दोन मुलांचा बाप आहे.

पीडित तरुणी खासगी संस्थेत कामाला आहे. रविवारी रात्री ती आपल्या घरी झोपली होती. या दरम्यान अमोल तिच्या घरात घुसला. अश्लील चाळे करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याला विरोध करीत मदतीसाठी आरडा-ओरड केली असता अमोलने तेथून पळ काढला. पीडितेने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पारडी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी काठे पथकासह घटनास्थळी पोहोचले. पीडितेचा जबाब नोंदवून अमोलविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत तुरूंगात रवानगी करण्यात आली. अमोल बऱ्याच दिवसांपासून पीडितेला त्रास देत असल्याची माहिती मिळाली आहे.