नागपूर : वाघधरा येथे तीन मित्रांची निघृण हत्या करणा-या आरोपीला नागपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राजू बिरहा याने पान टपरीच्या जागेवरून तीन मित्रांचा सत्तुरने खून केला होता. सत्र न्यायालयाने बिरहा याला डिसेंबर २०२२ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.
हेही वाचा >>> ‘सिल्वर लेक फार्म रिसॉर्ट’ बनला ‘सेक्स रॅकेट’चा अड्डा! १३ बारबालांना घेतले होते पोलिसांनी ताब्यात
फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने शिक्षेवर शिक्कामोर्तब करणे आवश्यक आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाच्यावतीने उच्च न्यायालयात हे प्रकरण सादर करण्यात आले . जुलै महिन्यात न्या.विनय जोशी आणि न्या.वाल्मिकी मेनेझेस यांच्या समक्ष प्रकरणावर सुनावणी झाली आणि न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. १२ ऑक्टोबरला न्यायालयाने बिरहाच्या वागणुकीबाबत कारागृह प्रशासनाकडे विचारणा केली होती. कारागृ़ह प्रशासनाने बिरहाची वर्तवणूक साधारण असल्याचे न्यायालयाला सांगितले. कारागृहात बिरहाविरोधात शिस्तभंगाची कोणतीही तक्रार नसल्याचे कारागृह प्रशासनाने अहवालात सांगितले आहे. शासनाच्यावतीने ॲड.संजय डोईफोडे, आरोपीच्यावतीने ॲड.अनिल मार्डीकर आणि ॲड.सुमित जोशी यांनी बाजू मांडली.