नागपूर : बहुचर्चित रामझुला ‘हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपी रितू मालू हिचा बचाव करण्याचे प्रयत्न नागपूर पोलीस करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अपघातानंतरही पोलीस आरोपीला अद्याप अटक करू शकले नाही. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपास सीआयडीला देण्यात यावा, अशी याचिका अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात केली होती. न्या. विनय जोशी आणि न्या. एम.जवळकर यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सीआयडीकडे तपास वर्गीकृत करण्याचा निर्णय शुक्रवारी दिला.

मृत मोहम्मद आतिफचा भाऊ शाहरुख झिया मोहम्मद यांनी ही याचिका दाखल केली आहे. रितू मालूने अपघातात दोघांचा बळी घेतल्यावर तहसीलचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम भावळ हे सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपी रितू आणि तिची मैत्रीण माधुरी सारडा हिला ताब्यात घेण्याऐवजी त्यांना पळून जाण्यास मदत केली. घटनेनंतर रितू मालूची वैद्यकीय तपासणी सहा तास उशिराने करण्यात आली. पोलिसांनी अवैधरित्या अपघातातील कार मालकाच्या स्वाधीन केली, यासह अनेक आरोप तहसील पोलिसांवर करण्यात आले. दुसरीकडे, पोलीस योग्य पद्धतीने तपास करीत आहेत. त्यांनी प्रत्येक पुरावे गोळा केले आहे. पोलिसांवरील आरोप निराधार आहेत. रितू मालू पोलिसांना तपासात सहकार्य करीत नाही. पोलिसांनी सीपी क्लबमधून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले आहे. इतर महत्त्वपूर्ण पुरावेही पोलिसांकडे आहेत. मात्र, तिच्या अटकेची परवानगी न मिळाल्याने अद्याप तिला अटक झाली नाही. पोलिसांचा तपास योग्य दिशेने असून त्यांच्यावर अविश्वास दाखवणे योग्य नाही, असा युक्तिवाद मुख्य सरकारी वकील ॲड. देवेंद्र चव्हाण यांनी केला होता.

हेही वाचा…स्थानिकांचा विरोध डावलून मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमीपूजन, पटोले यांची टीका

पोलिसांवर गंभीर आरोप

याचिकाकर्त्याच्यावतीने ॲड. अमोल हुंगे यांनी न्यायालयाला सांगितले की, रितू मालूने अपघातात दोघांचा बळी घेतल्यावर तहसील पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक परशुराम भावळ हे सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपी रितू आणि तिची मैत्रीण माधुरी सारडा हिला ताब्यात घेण्याऐवजी त्यांना पळून जाण्यास मदत केली. तहसील पोलिसांना पहाटे ४.३० वाजता घटनेची तक्रार देण्यात आली. परंतु, त्यांनी सकाळी ९.३१ वाजता गुन्हा दाखल केला. घटनेनंतर रितू मालूची वैद्यकीय तपासणी सहा तास उशिराने करण्यात आली. घटनेनंतर पोलिसांनी स्पॉट पंचनामा केला नाही. पोलिसांनी १५ एप्रिल रोजी कार जप्त केली होती. नंतर, ही कार २५ मे रोजी मानकापूर येथील एका गॅरेजमध्ये नेण्यात आली होती. पोलिसांनी अवैधरित्या ही कार मालकाच्या स्वाधीन केली होती.