नागपूर : कुटुंबात झालेले वाद, प्रेमप्रकरण, अनैतिक संबंध कौटुंबिक हिंसाचार आणि वैवाहिक जीवनात आलेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या भरोसा सेलमध्ये गेल्या आठ वर्षांत १६ हजार ८४३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १५ हजारांवर तक्रारी यशस्वीपणे सोडविण्यात आल्या. तर दुभंगलेल्या ७ हजार १७२ दाम्पत्यांचा विस्कळीत झालेला संसार भरोसा सेलने पुन्हा रुळावर आणला आहे.
शहरात बलात्कार, विनयभंगासह कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक छळ, शारीरिक व मानसिक छळ, विवाहबाह्य संबंध आणि प्रेमसंबंधातून घरगुती स्वरुपांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. अशा तक्रारींमुळे पोलीस ठाण्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत होत तसेच आरोपींचीही संख्या वाढत होती. कौटुंबिक तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी योग्य त्या प्रमाणात प्रयत्न होत नसल्यामुळे तत्कालिन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम् यांनी गुन्हे शाखेच्या अंतर्गत २०१७ मध्ये भरोसा सेलची स्थापना केली. तेव्हापासून कौटुंबिक हिंसाचार किंवा घरगुती वाद-विवादाच्या तक्रारींची नोंद भरोसा सेलमध्ये करण्यात येत आहे.
हेही वाचा – चंद्रपूरच्या ध्येयवेड्या तरुणांनी स्थापन केली ‘बस टॅप करो’ कंपनी
गेल्या आठ वर्षांत भरोसा सेलमध्ये १६ हजार ८४३ तक्रारींची नोंद करण्यात आली. या तक्रारींपैकी १५ हजारांपेक्षा जास्त कुटुंबियांचे भरोसा सेलकडून समूपदेशन करण्यात आले. अनेक दाम्पत्यांचा विस्कळीत झालेला संसार पुन्हा रुळावर आला आहे. भरोसा सेलमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्येसुद्धा घट आली आहे. तुटण्याच्या काठावर असलेला संसारसुद्धा पोलिसांच्या प्रयत्नामुळे पुन्हा थाटल्या जात आहेत. पती-पत्नीचा वाद आणि त्यांच्यातून बिघडलेल्या संसाराबाबत सर्वाधिक तक्रारी येथे नोंदविण्यात आल्याची माहिती आकडेवारीतून समोर आली आहे.
क्षुल्लक वादातून संसारात विघ्न
लग्न झाल्यानंतर मुलीच्या संसारात माहेरच्या मंडळींचा अतिहस्तक्षेप आणि सासरकडून नवख्या सुनेकडून अनपेक्षित अपेक्षा यामुळे नवदाम्पत्यांच्या संसारात विघ्न पडत आहेत. कुटुंबात आई-वडिल, पती-पत्नी आणि अन्य सदस्यांमध्ये एकमेकांशी संवाद कमी झाला आहे. त्यामुळे कौटुंबिक वादाच्या घटना घडत आहेत. कौंटुबिक तक्रारींमध्ये पती-पत्नी यांच्यातील अहंकारामुळे सुरळीत सुरु असलेल्या संसाराला ग्रहण लागत आहे. मात्र, भरोसा सेलमध्ये समूपदेशनानंतर अनेकांचे संसार सुस्थितीत आले आहेत.
हेही वाचा – विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
भरोसा सेल हे प्रत्येक पीडित महिलेसाठी माहेर आहे. नाजूक नात्यांची गुंफन असलेल्या काही संवेदनशिल तक्रारींची उकल करताना पोलीस आणि समूपदेशकांना तारेवरची कसरत करावी लागते. भरोसा सेलमध्ये अनुभवी समूपदेशकासह पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने समस्यांवर तोडगा काढल्या जात आहे. – सीमा सुर्वे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरोसा सेल)