नागपूर : तरुणीला भूतबाधा झाली असून तिच्यासाठी २१ दिवस धार्मिक पूजा करावी लागेल. तसेच तरुणीमुळे अन्य महिलांनाही भूतबाधा झाल्याचे बतावणी करून आई,मुलगी,मामी आणि ६० वर्षीय आजीवर बलात्कार केला. तसेच तंत्र-मंत्राने उपचार करण्याच्या बहाण्याने कुटुंबातील तरुणीचे लैंगिक शोषण करीत होता. अशाच प्रकारे त्याने कुटुंबातील इतर तीन महिलांवरही लैंगिक अत्याचार केला. त्याने जवळपास अडीच वर्षांपर्यंत त्या कुटुंबातील महिलांचे शोषण केले. अखेर त्याचे बिंग फुटले आणि पोलिसात तक्रार करण्यात आली. पोक्सोच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ.पी.जयस्वाल यांनी नराधम भोंदूबाबाला दोषी ठरवून २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. धर्मेंद्र विठोबा निनावे उर्फ दुलेवाले बाबा (५०) रा. अंबेनगर, भांडेवाडी, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पारडी पोलिसांनी ९ जानेवारी २०२१ रोजी १७ वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दुलेवाले बाबाविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. दोन दिवसानंतर त्याला अटक करण्यात आली. पीडितेच्या वडिलांची दुलेवाले बाबाशी ओळख होती. पीडिता नेहमी आजारी राहात असल्याने कुटुंबीय चिंतीत होते. वडिलांनी याबाबत दुलेवाले बाबा याला माहिती दिली. त्याने मुलीला भूतबाधा असून भूताला पळविण्यासाठी २१ दिवसांपर्यंत तांत्रिक पूजा करावी लागेल, असे सांगितले.

हेही वाचा…‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीच्या निशाण्यावर आलेले वडपल्लीवार आहेत तरी कोण ?

मात्र पूजा करण्याच्या बहाण्याने दुलेवाला बाबा तरुणील गुंगीकारक औषध खायला देऊन तिच्यावर बलात्कार करीत होता. त्यानंतरही दुलेवाला बाबाने भूतबाधा पूर्णपणे दूर झाली नसल्याची बतावणी करून तरुणीला निर्जनस्थळी घेऊन गेला. तेथे त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. काही दिवसानंतर त्याने तरुणीच्या आईला भूतबाधा झाल्याचे सांगून तिच्यावरही बलात्कार केला. त्यानंतर तरुणीच्या मामीलाही जाळ्यात ओढले. तिच्यावर धार्मिक पूजा करण्याच्या बहाण्याने बेशुद्ध करून बलात्कार केला. तरुणी तिची आई आणि मामी यांना भूत काढण्याच्या बहाण्याने चंद्रपूर, छत्तीसगड आणि डोंगरगाव येथे घेऊन गेला. तेथे गुंगीचे औषध देऊन तिघींवरही रात्रीला बलात्कार करीत होता. शुद्धीवर येताच महिलांना वेगवेगळ्या कारणाने कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची भीती दाखवत होता.

असा लागला छडा

दुलेवाले बाबाने कुटुंबातील सर्वच महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्याची हिम्मत एवढी वाढली की त्याने तरुणीच्या ६० वर्षीय आजीलाही सोडले नाही. आजीवरही पूजा करण्याच्या नावावर बलात्कार केला. चौघींनाही त्याने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बाध्य केल्यानंतर तरुणीने आईला ही बाब सांगितली. त्यानंतर मामी आणि आजीलाही विचारणा केली. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय केला. अखेर कुटुंबातील महिलांनी एकमेकींशी चर्चा केली आणि चौघांवरही त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले.

हेही वाचा…यवतमाळात मुसळधार, अनेक गावांत पाणी शिरले; पैनगंगा नदीला पूर

अखेर गुन्हा दाखल

तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गोदमले यांनी प्रकरणी गुन्हा दाखल केला. भोंदूबाबाला अटक केली. त्याने चौघींवर बलात्कार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने दुलेवाला बाबा याला पोक्सो व अत्याचार प्रकरणात २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पोलीस हवालदार उमेश मेश्राम आणि भास्कर बनसोड यांनी तपासात सहकार्य केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur bhondu baba sentenced to 20 years for raping four women under pretext of exorcism ritual adk 83 psg