कालावधी ४० तासांचा आणि अंतर ६०० किलोमीटरचे.. वाट तशी कठीण, पण लक्ष्य गाठायचेच होते.. नागपुरात अयशस्वी ठरल्यानंतर हैदराबादमध्ये त्यांनी प्रयत्न केला. यातला एक पट्टीचा सायकलपटू तर एकाने सहा महिन्यांपूर्वीच सुरुवात केली. मात्र, दोघांनीही अवघ्या ३८ तासांत लक्ष्य गाठले आणि नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
पॅरिसमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस रँदेन्युर्स’च्या धर्तीवर भारतातसुद्धा ‘ऑडक्स क्लब पॅरिसिएन’च्यावतीने २००, ३००, ४००, ६००, १००० किलोमीटरच्या ब्रेव्हेट आयोजित केल्या जातात. हैदराबाद येथे अलीकडेच ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान ६०० किलोमीटरची ब्रेव्हेट आयोजित करण्यात आली. भारतातून तब्बल २८ सायकलपटू यात सहभागी झाले. यात नागपुरातून जितेश ठक्कर आणि अनिरुद्ध रईंच सहभागी झाले. नागपुरात गेल्या वर्षभरात सायकल संस्कृती बरीच रुजली असून खेळाडू नव्हे तर अनेक सायकलपटू तयार होत आहेत. त्यातूनच नागपुरात सुरुवातीला २००, ३००, ४०० किलोमीटरची ब्रेव्हेट आयोजित करण्यात आली आणि त्याला चांगला प्रतिसादही लाभला. यातूनच महिनाभरापूर्वी ६०० किलोमीटरची ब्रेव्हेट नागपुरात आयोजित करण्यात आली. त्यात हे दोघेही सहभागी झाले, पण अडथळयांची ही शर्यत त्यांना पार करता आली नाही. म्हणूनच हैदराबाद येथे आयोजित ब्रेव्हेटमध्ये ते सहभागी झाले. पहिले १०० किलोमीटरचे अंतर त्यांनी अवघ्या चार तासांत पार केले.
दुसरे १०० किलोमीटरचे अंतर त्यांनी साडेपाच तासांत पूर्ण केले आणि येथून त्यांच्या खऱ्या कसोटीला सुरुवात झाली. अडथळयांमागून अडथळे समोर येत गेले. जसजसा वेळ सरकत गेला, तसतसे झोपेला आवरणे कठीण होत गेले.
१५ मिनिटांची झोप घेऊन पुढे निघत नाही तोच सिद्धीपेठ या ठिकाणी पावसाचा मारा वाढला. कडाडत्या विजेत आणि कोसळत्या पावसातली वाट कशीबशी पार केली.
एकीकडे ब्रेव्हेटचे अंतर कमीकमी होत असतानाच दुसरीकडे वीज पडून मृत्यूची मालिका दुसऱ्या बाजूने सुरू झाली होती. हा अडथळा कसाबसा पार केला आणि ४० तासांचे अंतर ३८ तास २८ मिनिटांत पार करून या दोन्ही नागपूरकरांनी लक्ष्य गाठले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा