नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या रामटेक आणि देवलापार या ग्रामीण भागातील काँग्रेस आणि काँग्रेस समर्थीत पक्षातील तब्बल २२ सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस सह इतर महाविकास आघाडीतील पक्षांना मोठे खिंडार पडले आहे.
यावेळी आमदार आशीष देशमुख, आमदार समीर मेघे, आमदार चरणसिंग ठाकूर, ग्रामीण अध्यक्ष सुधाकरराव देशमुख, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार राजू पारवे, डॉ. राजीव पोद्दार,अनिल निधान यांच्यासहपक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकसित भारत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्र या संकल्पाला साथ देण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा पक्ष प्रवेश केला. या सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

ते पुढे म्हणाले, मोदी सरकार आणि फडणवीस सरकारच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाचे संघटन मजबुत करणे हा या पक्ष प्रवेशामागचा उद्देश आहे. संघटना मजबूत असेल तर सरकारच्या योजना सर्व समाजापर्यंत पोहचवता येईल. भाजप आज देशात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. आज देशात पक्षाने १३ कोटी तर राज्यात१ कोटी ४६ लाख सदस्य नोंदणी केली आहे. राज्यात १ कोटी ५१ लाख सदस्य नोंदणी करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. आपण सर्वांनी आपल्या भागात दौरा करून प्रत्येक गावातून १ हजार सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष ठेवा. आपल्या पक्षाचे संस्कार आणि संस्कृती जपा. समाजात वागताना जबाबदारीने राहा. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या पक्षात स्थान नाही. त्यामुळे चांगले काम करा आणि समाजाच्या तळागाळापर्यंत सरकारच्या योजना घेऊन जा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur big setback for congress 22 sarpanch joined bjp in the presence of chandrashekhar bawankule dag 87 css