चंद्रपूर : भाजपमधील अंतर्गत कलह चंद्रपूरच्या राजकारणात आता रोजचाच चर्चेचा विषय राहिला आहे. त्याला कारण विधानसभा निवडणूक पूर्वी भाजपा एक मंच , एक कार्यक्रम असा उपक्रम होता. आता एक कार्यक्रम , दोन मंच असा नित्यक्रम सुरू झाला आहे. शनिवारी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंचमुखी हनुमान मंदिर येथे भक्तनिवास चे लोकार्पण केले. त्याच भक्त निवासाचे लोकार्पण आता पालकमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उइके यांच्या हस्ते रविवार १३ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान पालकमंत्री उइके यांचा आज अधिकृत दौरा नाही. त्यामुळे आजचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार करतात की अन्यकुणी याकडे लक्ष लागले आहे.
या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात सुरू झालेले राजकीय शीतयुद्ध आता उघड संघर्षात परावर्तित झाला आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे घुग्घूस परिसरातील पांढरकवड्यातील पंचमुखी हनुमान मंदिर, जिथं एका ‘भक्तनिवास’साठी दोन स्वतंत्र लोकार्पण समारंभ आयोजित करण्यात आले — एक अधिकृत, आणि दुसरं ‘राजकीय धक्का’! सुमारे १.५ कोटींच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेला हे भक्त निवास आहे. मुनगंटीवार यांनी गतवर्षी पंचमुखी देवस्थान हनुमान मंदिर, पांढरकवडा येथे दर्शनासाठी भेट दिली असता, मंदिराच्या विश्वस्त मंडळाने भक्त निवास उभारण्याची मागणी केली होती. हे तीर्थक्षेत्र ‘क’ वर्गात असल्यामुळे निधी मंजूर करणे कठीण होते. मात्र, विशेष बाब म्हणून १ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून भक्त निवासाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, त्यामुळे पांढरकवड्याचा धार्मिक व सांस्कृतिक विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लोकार्पण प्रसंगी व्यक्त केला.
नवीन भक्त निवासाचे लोकार्पण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला डॉ. मंगेश गुलवाडे, विवेक बोढे, ब्रिजभूषण पाझारे, अनिल डोंगरे, नम्रता ठेमस्कर, विक्की लाडसे, लक्ष्मण सादलावार आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आमदार मुनगंटीवार म्हणाले, श्री हनुमानने प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती भक्तांना द्यावी. यापुढे मंदिर परिसरातील उर्वरित कामांसाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी शिल्लक कामांची यादी तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. “भक्त निवासामुळे पंचमुखी हनुमान मंदिरात येणाऱ्या भाविकांना अधिक सोयीसुविधा मिळणार असून, त्यामुळे पांढरकवड्याचा धार्मिक व सांस्कृतिक विकास अधिक गतीने घडेल,” असा पुनरुच्चार आमदार मुनगंटीवार यांनी केला. राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, मी वनमंत्री असताना श्रीक्षेत्र भीमाशंकर, औंढा नागनाथ येथे अनेक सुविधा निर्माण केल्या. शिखर शिंगणापूर येथे १२०० बेलाची झाडे लावण्यात आली आहेत. पंढरपूर येथे तुळशी वृंदावन विकसित करण्यात आले. तसेच तेथे विविध प्रजातींची तुळस लावण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये मल्टिप्लेक्स संकीर्तन सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून, ते कीर्तन, प्रवचन व प्रबोधनासाठी उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान मुनगंटीवार यांनी शनिवार १२ एप्रिल रोजी लोकार्पण केल्यानंतर रविवारी, १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता पुन्हा या भक्त निवासाचे लोकार्पण होणार आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आमंत्रण पत्रिका छापण्यात आली असून, पालकमंत्री अशोक उईके उद्घाटक, तर दोन खासदार आणि आठ आमदार प्रमुख पाहुणे म्हणून नमूद आहेत. पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील भक्तनिवास हे आता सत्तासंघर्षाचं मैदान झालं आहे. जनसेवेच्या नावाने उभारलेली ही वास्तू आता सत्ताकांक्षा आणि वर्चस्वाच्या लढाईचं प्रतीक बनली आहे. मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. राजकीय वर्तुळात याला भाजपमधील “सत्ता संघर्ष” आणि “वर्चस्व युद्ध” असे संबोधले जात आहे.
रविवारी काय होणार?
आता सगळ्यांच्या नजरा १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या लोकार्पण कार्यक्रमाकडे लागल्या आहेत. पालकमंत्री या लोकार्पणाला उपस्थित राहणार का? मुनगंटीवार या कार्यक्रमात सहभागी होणार का? जोरगेवार गट याला पक्षाच्या ऐक्याचं प्रदर्शन बनवू शकेल का? की हे वाद आणखी चिघळून भाजपसाठी गटबाजीचं कारण ठरेल? रविवार १३ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमातील आमंत्रित मान्यवर: अशोक उईके (पालकमंत्री, महाराष्ट्र शासन), नामदेव किरसान (खासदार, गडचिरोली), प्रतिभा धनोरकर (खासदार, चंद्रपूर), किशोर जोरगेवार, सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, अभिजीत वंजारी, कीर्तीकुमार भांगडिया, सुधाकर अडबाले, देवराव भोंगले, करण देवतळे (आमदारगण) विनय गोंडा (जिल्हाधिकारी, चंद्रपूर), अरुण गाडेगोणे (अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग), अक्षय पगारे (कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडी, चंद्रपूर)
पुढे काय होणार?
भक्तनिवासावर झालेलं ‘डबल उद्घाटन’ स्पष्टपणे दाखवतं की भाजपमधील अंतर्गत फाटाफूट आता नियंत्रणाबाहेर जात आहे. धर्म आणि विकासाच्या नावाने सुरू झालेली ही राजकीय स्पर्धा दाखवते की निवडणूक संपल्यानंतरही सत्तेची भूक शमलेली नाही. आता पाहावं लागेल की भाजपचं केंद्रीय नेतृत्व या ‘हनुमान स्थळा’तून उठलेल्या वादळाला कसं शांत करतं — की हे प्रकरण पक्षासाठी आणखी एक डोकेदुखी ठरणार? एक प्रश्न जनतेतून उठतोय: पंचमुखी हनुमान भाजपला पुन्हा एकमुखी करू शकतील का? की ही गटबाजी पक्षाला आणखी उध्वस्त करेल?