Nagpur explosives manufacturing: नागपूरला संत्रा नगरी म्हणून ओळखले जाते. संत्र्याचे उत्पादन घेणाऱ्या नागपूरमधून संत्र्याची निर्यात होत होती. पण आता नागपूरच्या दारूगोळा बनविणाऱ्या कंपन्यांतून हजारो कोटींची दारूगोळ्याची निर्यातही होत आहे. जगभरात अनेक देशांमध्ये तणाव पाहायला मिळत आहे. रशिया-युक्रेनमध्ये दोन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. तर इस्रायलने गाझा, लेबनान, इराण विरोधात युद्ध छेडून आता एक वर्ष झाले आहे. अशा या युद्धग्रस्त वातावरणात नागपूरमधील दारूगोळा तयार करणाऱ्या कंपन्यांना मात्र चांगलाच नफा होत आहे. येथील कंपन्यांना आतापर्यंत तीन हजार कोटींची ऑर्डर मिळाली असून आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांचा माल निर्यात केला गेला आहे, अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
जे देश युद्धात प्रत्यक्ष सहभागी आहेत, त्यांना दारूगोळा पुरविला जात नसला तरी टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बल्गेरिया, स्पेन, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, ब्राझील, पोलंड आणि सौद अरेबिया या देशातून दारूगोळ्याची जोरदार मागणी आहे. कदाचित या देशांनी दारूगोळा विकत घेतल्यानंतर त्यांच्याकडून युद्धखोर देशांना तो हस्तांतरीत केला जात असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
हे वाचा >> युद्ध इराण-इस्रायलचं, पण भुर्दंड जगाला! कच्च्या तेलाचे भाव वाढले, भारतावर नेमका काय परिणाम होणार?
मागच्या तीन महिन्यात नागपूरमधील कंपन्यांनी ९०० कोटींची स्फोटके आणि दारूगोळा निर्यात केला आहे. तर आणखी तीन हजार कोटींची ऑर्डर त्यांना मिळालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॉवित्झर गनमधून डागता येणारे १५५एमएम कॅलिबर (रॉकेटसमान तोफगोळे), खांद्यावरून डागता येणारे ४०एमएमचे रॉकेट या आधुनिक शस्त्रांची विदेशातून तुफान मागणी आहे. तसेच कच्च्या स्फोटकांचीही तितकीच मागणी आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर-अमरावती मार्गावरील बाजारगाव येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा निर्मिती करणारे कारखाने उभारलेले आहेत. सध्या या कारखान्यांना मोठ्या प्रमाणात शस्त्रांसाठी ऑर्डर मिळत आहेत. मात्र आम्ही युद्धात सक्रिय असलेल्या देशांना शस्त्रसाठा पुरवत नाहीत, असे एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. विदेशातून शस्त्रांची मागणी झाल्यानंतर भारत सरकारकडून त्यासंबंधी परवाना घ्यावा लागतो. तसेच भूराजकीय परिस्थितीमुळे भारत सरकारने काही देशांना शस्त्रसाठा पुरविण्यापासून मनाईही केलेली आहे.
बॉम्बची सर्वाधिक निर्यात
यावर्षी बॉम्ब आणि ग्रेनेडची सर्वाधिक निर्यात झाल्याचे कळते. एप्रिल ते जून महिन्यात ७७० कोटींचे बॉम्ब निर्यात केले गेले आहेत. तसेच जून नंतरची आकडेवारी अद्याप मिळालेली नाही. ही संख्याही कोट्यवधीत असू शकते. नागपूर लगत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातूनही दारूगोळा निर्यात केला जातो. चंद्रपूरमधूनही ४५८ कोटींचा दारूगोळा निर्यात केला गेला आहे.