नागपूर : ‘तुमच्या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असून लवकरच स्फोट होणार आहे’ अशी धमकी गणेशपेठ स्थानकाजवळ असलेल्या हॉटेल द्वारकामाईच्या ‘ई मेल’वर आली. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाच्या पायाखालची माती सरकली. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. बॉम्बस्फोटाची खबर पोहचताच पोलिसांचा मोठा ताफा हॉटेलसमोर आला. सोबतच बॉम्बशोधक-नाशक पथक आणि श्वान पथकही पोहचले. पोलिसांनी संपूर्ण हॉटेलची झडती घेतली. बॉम्ब मिळून आला नाही. त्यामुळे बॉम्बस्फोटाची अफवा निघताच पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली.
गणेशपेठ बसस्थानकाजवळील चार माळ्याचे द्वारकामाई हॉटेल आहे. सोमवारी सकाळी व्यवस्थापक हॉटेलमध्ये पोहचले. त्यांनी संगणक सुरु करुन हॉटेलची ‘ई मेल’ तपासले. त्यात एका अनोळखी ‘मेल आयडी’वरुन एक मेल आला होता. त्यात ‘तुमच्या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे. काही वेळातच स्फोट होणार आहे.’ असा उल्लेख होता. त्यामुळे व्यवस्थापक घाबरले. त्यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक नाशक पथकासह पोलिसांचा मोठा ताफा पोहचला. पोलिसांनी हॉटेलमधील ग्राहकांना बाहेर जाण्यास सांगितले. काही वेळातच हॉटेलमधील कर्मचारीही बाहेर काढले. पोलिसांनी बॉम्बचा शोध सुरु केला. हॉटेलमधील काही रुमची झाडाझडती घेण्यात आली.
हेही वाचा…न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याबाबत कायदा? केंद्र शासन म्हणतेय…
बॉम्ब शोधक-नाशक पथकाची दोन तास कसरत
गणेशपेठ बसस्थानक परिसर नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे बॉम्बस्फोटामुळे मोठी हाणी होण्याची शक्यता लक्षात घेता बॉम्बशोधक नाशक पथकाने दोन तास कसरत केली. हॉटेलमधील प्रत्येक खोलीची तपासणी केली. श्वान पथकाने वाहनस्थळाची जागा पिंजून काढली. मात्र, हॉटेलमध्ये काहीही आढळून आले नाही. हॉटेलच्या बाहेरच्या परीसरात एक संशयास्पद वस्तू आढळली. परंतु, तीसुद्धा बॉम्ब नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल हा खोळसाळपणा निघाला. मात्र, या अफवेमुळे मोठा गोंधळ आणि पोलिसांची तारांबळ उडाली होती.
हेही वाचा…‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
यापूर्वीसुद्धा उडाली होती बॉम्बची अफवा
गेल्या ऑक्टोबर महिन्यात वाडी परिसरात बॉम्ब सदृष्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन ही माहिती दिली होती. एका विद्यार्थ्याच्या ‘शूज’च्या डब्यात ती बॉम्ब सदृष्य वस्तू आढळून आली. बॉम्ब शोधक व नाशक पथकही पोहचले. त्यांनी ती बॉम्ब सदृष्य वस्तू ताब्यात घेतली. त्यानंतर त्या वस्तूची तपासणी केली असता तो विद्यार्थ्याचे ईलेक्ट्रॉनिक्स प्रात्याक्षिकाचे साहित्य असल्याचे समोर आले. मात्र, तोपर्यंत बॉम्बच्या अफवेने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.