नागपूर : परिक्षा जवळ आल्याने ‘इंस्टा रिल्स’ बघण्याऐवजी अभ्यासावर लक्ष दे, असे बजावल्यानंतरही मुलगा इंस्टाग्राम वापरताना दिसल्यामुळे वडिल मुलावर रागावले. भ्रमणध्वनी बघण्यास मज्जाव केल्यामुळे मुलाने रागाच्या भरात घरातून पलायन केले आणि थेट छत्तीसगढ गाठले. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने मुलाचा शोध घेऊन समूपदेशन केल्यानंतर पालकांच्या ताब्यात दिले. ही घटना बुधवारी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा जय (बदललेले नाव) हा अकराव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. त्याचे वडिल ट्रक चालक असून ते वेगवेगळ्या राज्यात माल पोहचविण्याचे काम करतात. त्यामुळे ते महिन्यातून दोनदा घरी येतात. जय हा दोन जुळ्या बहिणी आणि गृहिणी असलेल्या आईसोबत राहतो. त्याला करोना काळात शैक्षणिक कामासाठी वडिलांना ‘स्मार्टफोन’ घेऊन दिला होता.

त्याने समाजमाध्यमावर सक्रिय राहणे सुरु केले. त्याने फेसबुक, व्हॉट्सअपवर आणि इंस्टाग्रामवर रिल्स बघणे सुरु केले. त्याला मोबाईलचे एवढे व्यसन जडले की तो जेवन करताना किंवा शौचालयातसुद्धा भ्रमणध्वनी सोबत नेत होता. मुलगा नेहमी भ्रमणध्वनीवर व्यस्त राहत असल्यामुळे चिंताग्रस्त आईवडिलांनी त्याला अनेकदा आरडाओरड केली.

मात्र, त्याच्यात सुधारणा झाली नाही. परिक्षा जवळ आल्यामुळे वडिलांनी त्याला ‘इंस्टावर रिल्स’ बघणे बंद करुन अभ्यास करण्यास बजावले होते. त्यावर त्याने होकार देऊन भ्रमणध्वनी वापरणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर वडिल १५ दिवसांसाठी बाहेर राज्यात ट्रक घेऊन निघून गेले.

‘रिल्स’ बघताना मुलगा दिसताच चढला पारा

कोलकात्यावरुन वडिल ११ फेब्रुवारीला घरी परतले. मुलाचा अभ्यास कसा सुरु आहे, हे तपासण्यासाठी ते मुलाच्या खोलीत शिरले. त्यांना मुलगा ‘इस्टाग्रामवर रिल्स’ बघताना दिसला. त्यामुळे वडिलांचा पारा चढला. ‘तुला इंस्टा रिल्स बघू नकोस. अभ्यासाला वेळ दे’ असे बजावल्यानंतरही तू भ्रमणध्वणीवर रिल्स का बघत आहेस.?’ असा प्रश्न केला. तसेच त्याच्यावर चांगली आरडाओरड केली. त्यानंतर त्यांनी पत्नीवरही आरडाओरड केली. त्यामुळे घरातील वातावरण तापले.

घेतला घर सोडण्याचा निर्णय

वडिलांनी रागावल्यामुळे जयने घर सोडण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या राज्यात जाऊन कामधंदा करुन किंवा नोकरी करुन आईवडिलांपासून दूर राहण्याचे त्याने ठरविले. ११ फेब्रुवारीला सायंकाळी त्याने रेल्वेस्थानक गाठले. रेल्वेस्थानकावर छत्तीसगढला जाणारी रेल्वे निघत होती. त्याने चालत्या रेल्वेत प्रवेश केला. तो रायपूर शहरात पोहचला आणि तेथे कामाच्या शोधात निघाला. मात्र, तेथे कुणीही त्याला काम देत नव्हते. तो पुन्हा रेल्वेेस्थानकावर आला. रेल्वेने नागपूरकडे जाणाऱ्या एका नातेवाईकाच्या नजरेस पडला. त्यांनी त्याला नागपुरात आणले. मात्र, जय हा घरी गेला नाही. शेवटी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांच्या पथकाने त्याला कळमना मार्केटमधून ताब्यात घेतले. त्याचे समूपदेशन करुन पालकांच्या ताब्यात दिले.

Story img Loader