नागपूर : प्रेयसीचा साडेचार वर्षांचा मुलगा प्रेमात अडथळा ठरत असल्यामुळे प्रियकराने मुलाला रेल्वेत सोडून सुटका मिळविण्याचा कट रचला. कटानुसार प्रेयसीच्या मुलाला रेल्वेत सोडून त्याने पळ काढला. मुलाच्या वडिलाने अपहरण केल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आणि मुलाला वर्धा शहरातून सुखरुप ताब्यात घेतले. प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. ही घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. हंसराज दखने (२५) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो मुळचा गाव पोरा, लाखनीचा रहिवासी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित महिला ३० वर्षांची असून २०१९ मध्ये तिचे लग्न झाले. तिला साडेचार वर्षांचा एक मुलगा आहे. कौटुंबिक वाद असल्याने तिने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०२३ पासून ती नागपुरात एकटीत राहते. मिळेल ते काम करून कामच्याच ठिकाणी राहत होती. गणेशपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत ती एका हॉटेलमध्ये काम करीत होती. त्याच परिसरातील दुसऱ्या हॉटेलमध्ये आरोपी हंसराज दखने हा कुकचे काम करतो. दोघेही हॉटेलमध्ये काम करीत असल्याने त्यांच्यात ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि प्रेम व्हायला वेळ लागला नाही. नंतर दोघांनीही सोबत राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आरोपीने महिलेला लग्नाबाबत विचारले असता तिने मुलासह स्वीकारण्यास तयारी आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला. त्याच्या वागण्यात आणि कृतीत होकार दिसत असल्याने दोघेही पती-पत्नी प्रमाणेच राहात होते. मात्र, आरोपीला तिच्या मुलापासून सुटका मिळवायची होती. त्यामुळे त्याने मुलाला रेल्वेत सोडून पलायन करण्याचा कट रचला. हंसराजने तिच्या मुलाला शाळेत प्रवेश घेवून देतो, असे सांगून २१ जून रोजी मुलाला सोबत घेवून गेला. नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ४ वर आल्यानंतर वर्धामार्गे जाणाऱ्या गाडीत चिमुकल्यास सोडले आणि निघून गेला.

हेही वाचा – वर्धा : विद्यापीठाची सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ते आता थेट फोर्ब्सच्या यादीत मानांकन, जाणून घ्या अ‍ॅड. क्षितिजा यांचा प्रवास

गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथक आणि गणेशपेठ पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि एका पथकला वर्धा येथे रवाना केले. तत्पूर्वी, लोहमार्ग पोलिसांना सूचना दिल्याने त्यांनी चिमुकल्यास वर्धा स्थानकावर उतरविले. पोलिसांनी वर्धा गाठून मुलास नागपुरात आणले आणि त्याच्या आईच्या सुपूर्द केले. आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

हेही वाचा – चंद्रपूर : बेरोजगारीचे संकट गडद! पोलीस भरतीत डॉक्टर, अभियंता, एमबीए, एमटेक उमेदवार, बारावी, बीए झालेल्यांची अडचण

असा लागला घटनेचा छडा

महिलेने हंसराजला फोन केला. मात्र, फोन बंद होता. यावरून तिला संशय आला. हंसराज परत आल्यावर मुलासंदर्भात विचारपूस केली असता त्याने वेगळीच माहिती दिली. वर्धेला जाण्यासाठी निघालो असता खापरी परिसरात तीन जणांनी लहान मुलास पळवून नेले. तिची दिशाभूल करण्यासाठी मुलगा एका इसमास ‘पप्पा’ असे म्हणत असल्याचे सांगितले. महिलेने तिच्या पतीला मुलासंदर्भात विचारणा केली असता त्याने नकार देत पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. महिलेने गणेशपेठ पोलीस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. त्यावेळी आरोपी हंसराजसुद्धा सोबत होता. गणेशपेठ पोलीस आणि गुन्हे शाखेचे मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाने आरोपीची सखोल चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur boyfriend elopes leaving girlfriend son in the train adk 83 ssb