नागपूर : केंद्र व राज्य शासन बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जात असल्याचा दावा होतो. परंतु आजही ग्रामीण सोडा शहरी भागातही बोगस डॉक्टरांची कमी नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. दरम्यान नागपुरात एका डॉक्टरच्या मृत्यूनंतर वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांनाही बहीण- भावाने चक्क बोगस दवाखाना टाकल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात पुढे आला आहे.

नागपुरातील अन्सारनगर परिसरात हा प्रकार आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणात डॉक्टर वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे मुल असलेल्या भाऊ- बहीणीने कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांनाही हे दवाखाणा चालवण्याचे धक्कादायक कृत्य केले. नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर तहसील पोलीस आणि नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या दवाखान्यावर संयुक्त कारवाई केली गेली.

सूत्रांच्या माहितीनुसार डॉक्टर साजिद अन्सारी हा दवाखाणा चालवायचे, त्यांचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा २३ वर्षीय जैद अन्सारी आणि बहीण समन अन्सारी हे नियम धाब्यावर बसवून दवाखाना चालवत होते. कुठलेही वैद्यकीय शिक्षण न घेता या दवाखान्यात ते दोन पाळीमध्ये रुग्णांवर उपचार करत होते. अवैध दवाखान्यामध्ये रक्तदाब मोजण्याची बीपी मशीनसह वैद्यकीय साहित्य ठेवले होते. सोबतच इंजेक्शन, औषधे, सलाईन देखील पोलीसांसह नागपूर महापालिकेच्या कारवाईसाठी केलेल्या चमूंना आथळली. नागपूर महापालिकेचा आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात पुढे काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बोगस डॉक्टरांवर कारवाई काय?

बोगस पदवी प्रमाणपत्र घेऊन वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना शोधून कारवाई करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांना सातत्याने बोगस डॉक्टरचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही नागपूरसह राज्यातील काही भागात बोगस डॉक्टर आढळून येत आहे. त्यामुळे या डॉक्टरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. या डॉक्टरांवर नियंत्रणासाठी सरकारसह स्थानिक प्रशासनाकडून कठोर कारवाई कधी होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नागपूर शहरातही यापूर्वी अनेक बोगस डॉक्टर नागपूर महापालिकेचा आरोग्य विभागासह पोलिसांकडून पकडले गेले. परंतु त्यानंतरही अन्सारनगर परिसरात डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर थेट त्यांच्या मुलांनी कोणतीही वैद्यकीय डिग्री नसतांना रुग्णांवर उपचार करण्याचा प्रताप केल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Story img Loader