नागपूर : रस्त्याच्या कामात त्रुटी राहिल्यास मोठे नुकसान होत नाही. पण, उड्डाणपुलाचे काम सदोष असल्यास जीवितहानी होण्याची शक्यता असते. तरीही कोळशाच्या राखेचा अवाजवी वापर व कामाच्या गुणवत्तेशी तडजोड करून रस्ते आणि उड्डाणपूल उभारले जात असल्याने या बांधकामाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असा सूर या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या चर्चेतून उमटला.

सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त अधीक्षक अभियंता अजय पोहेकर आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणमधून निवृत्त अभियंता अमिताभ पावडे यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व नागपुरातील उड्डाणपुलांचे बांधकाम, त्यांची गुणवत्ता आणि अपघाताचा धोका या विषयांवर सविस्तर चर्चा केली. नागपुरातील उड्डाणपुलांचे बांधकाम, त्यांची गुणवत्ता आणि अपघाताचा धोका या विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बुटीबोरी उड्डाणपूल साडेतीन वर्षांतच खचला. तसेच पारडी उड्डाणपुलाचे उदघाटन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सिमेंटचा एक तुकडा निखळून चारचाकीवर पडला. या दोन्ही ताज्या घटना आणि शहरातील सिमेंट रस्त्यांना गेलेले तडे या पार्श्वभूमीवर त्यांनी ही चर्चा केली.

पोहेकर म्हणाले, रस्ते किंवा उड्डाणपुलांचे अपयश हे जेथून जडवाहने जातात तिथे दिसून येते. यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. मात्र, प्रामुख्याने अयोग्य साहित्य हे मूळ कारण असू शकते. सरकारने सिमेंटमध्ये २० टक्के कोळशाची राख मिसळण्याची परवानगी दिली आहे. पण, संबंधित बांधकाम व्यावसायिक त्यापेक्षा अधिक राख तर वापरत नाही ना, हा संशोधनाचा विषय आहे. राख अल्पदरात उपलब्ध आहे. तंत्रज्ञान विकसित झाल्याने ती वापरण्याची परवानगी दिल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु उच्च दर्जाचे काम हवे असेल तर केवळ सिमेंटचाच वापर झाला पाहिजे. राख वापरल्यामुळे सिमेंटची उपयोगिता घटते. दुसरे म्हणजे योग्य प्रकारची गिट्टी आणि वाळू वापरायला हवी. यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड झाली तर गुणवत्ता ढासळणार, हे निश्चित आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

कॅन्टीलिव्हरची सुरक्षा कंत्राटदाराची जबाबदारी

बुटीबोरी उड्डाणपुलाच्या कॅन्टीलिव्हरवरून जडवाहन गेल्याने पूल खचल्याचे सांगण्यात येत आहे. मूळ पुलाचा विस्तारित भाग म्हणजे कन्टीलिव्हर. ते जडवाहनाचा भार सहन करू शकत नसल्याने पूल खचला असेल तर कॅन्टिलिव्हर सुरक्षित ठेवण्यात संबंधित कंत्राटदार उपयशी ठरला, असा त्याचा अर्थ होतो. त्या भागातून वाहने जाणार नाही, अशी रचना करणे आवश्यक होते. अधिक जडवाहनांना प्रतिबंध घालण्यासाठी जुन्या पुलांना उंच कठडे लावण्यात येतात, असेही पोहेकर यांनी सांगितले.

सर्व उड्डाणपुलास रेल्वेचे निकष हवे

उड्डाणपुलांवर सर्वोत्तम सुरक्षा असणे आवश्यक आहे. रेल्वे उड्डाणपूल उभारताना याबाबत काळजी घेतली जाते. आर.ओ.बी. उभारताना रेल्वेच्या सीमेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा इतर एजन्सी काम करते. रेल्वेत हद्दीतील बांधकाम रेल्वे स्वत: करते किंवा त्यावर लक्ष ठेवून असते. रेल्वे हद्दीतील पुलाच्या कामासाठी तुलनेने ‘हेव्ही स्ट्रक्चर’ वापरावे लागते. यामुळे बांधकाम खर्च वाढतो, परंतु धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी होते. हीच पद्धत शहरातील प्रत्येक उड्डाणपुलासाठी वापरल्यास पूल खचण्याचा धोका कमी होईल, असेही पोहेकर म्हणाले.

कमी दरात निविदा म्हणजे गुणवत्तेशी तडजोड

बुटीबोरी उड्डाणपुलाची रचना चुकीची ठरली आहे. हा पूल तोडून नव्याने उभारला पाहिजे. पुलाचे डिझाईन तयार करताना सुरक्षितता या घटकाचा विचार आधी केला जातो. १०० टन वजन क्षमतेचा उड्डाणपूल उभारताना त्या पुलाचे डिझाईन २५० ते ३०० टनाच्या क्षमतेच्या दृष्टीने तयार केले जाते. बुटीबोरी पूल साडेतीन वर्षांत खचणे आश्चर्यकारक आहे. या प्रकरणात गुणवत्तेशी तडजोड झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. पूल बांधकामाच्या बहुतांश निविदा कमी दराच्या असतात. एखादी वस्तू १०० रुपयांची असेल तर ती ५० रुपयांत कशी मिळू शकते? कंत्राटदार आपल्या खिशातून पैसे टाकून बांधकाम करतील का? निविदा प्रक्रिया पारदर्शक नाहीत, याकडे अमिताभ पावडे यांनी लक्ष वेधले.

Story img Loader