नागपूर: राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांचा भाजप उमेदवार प्रवीण दटके यांनी पराभव केला. सामान्यत: जिंकलेला उमेदवार जल्लोष साजरा करतो. परंतु बंटी शेळके पराभवानंतरही मतदारसंघात रॅली काढत असून त्याचे कारण आपण जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील काही दिवसांपासून बंटी शेळके मध्य नागपूर मतदारसंघातील वेगवेगळ्या भागात पायाला भिंगरी लागल्या प्रमाणे रॅली काढत आहे. या रॅली बघून सर्वसामान्य नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. रॅली दरम्यान बंटी शेळके लहान मुलांच्या घोळक्यात बसणे, ज्येष्ठांचा आर्शीर्वाद घेणे, महिलांशी हितगूज करत त्यांना नमस्कार करीत आहे. अनेक तरुण व ज्येष्ठांची ते गळाभेटही घेत आहे. हा प्रकार ते मध्य नागपूर मतदारसंघातील नागरिकांनी त्यांना तब्बल ८० हजारावर मतदान केल्यामुळे करत असल्याचे त्यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केले आहे. मागच्या (२०१९) निवडणूकीत त्यांना येथून सुमारे ७० हजार मतदान मिळाले होते. यंदाच्या निवडणूकीत त्यांना १० हजारांनी अधिक म्हणजे ८० हजार मतदान मिळाल्यामु‌ळे ते येथील जनतेचे आभार मानन्यासाठी रॅली काढत आहे.

हेही वाचा : एसटीच्या ‘शिवशाही’ बस अपघाताचे प्रमाण सर्वाधिक, ही आहेत कारणे…

चर्चेतील निवडणूक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुख्यालय असलेल्या मध्य नागपुरातील निवडणूक यंदा खूपच चर्चेत राहिली. या मतदारसंघातील मतदानाच्या दिवशी भाजप- काँग्रेस कार्यकर्ते अनेकदा सामोरासमोर आले. प्रचारादरम्यान महालातील बडकस चौकातून प्रियंका गांधींचा रोड-शो सुरू असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवल्यावर गोंधळ उडाला. मतदानाच्या दिवशीही बंटी शेळके यांनी भाजपच्या ‘मत चिठ्ठी’ मतदान केंद्रावर सापडल्यानंतर अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

हेही वाचा : गोंदिया : वडील आधीच दगावले, आता आईचाही मृत्यू; चिमुकला झाला पोरका…

मतदानाच्या दिवशी मोमीनपुरात पोलिसांनी नाकाबंदी केल्याचा आरोप करत एका समाजाला मतदानापासून रोखण्यात येत असल्याचा आरोप केला. पोलिसांशी वाद घातला. निवडणुकीच्या दिवशी बंटी शेळके यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करीत असल्याच्या आरोपातून ताब्यात घेण्यात आले. मतदान संपल्यावर बडकस चौकातच काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. अतिरिक्त ईव्हीएम घेऊन जात असलेली वाहने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गैरसमजातून अडवून त्याची काचे फोडली. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आमदार प्रवीण दटकेंना घेरले. धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे पोलिसांनी बंटी शेळके यांच्यासह काही कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या सगळ्या घटना बघता मतमोजणीनंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद वाढण्याची शक्यता होती. पण काँग्रेसचे स्वत: प्रवीण दटके यांच्याकडे गेले. तेथे त्यांनी प्रवीण दटके यांची गळाभेट घेतली. त्यामुळे वाद निवळला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur central assembly congress candidate bunty shelke back to back rallies after losing vidhan sabha election 2024 mnb 82 css