नागपूर : मध्यवर्ती कारागृहाच्या टॉवरवरून एका युवकाने कारागृहात एक पिशवी फेकली होती. त्यात चार मोबाईल, बँटरी आणि गांजा आढळून आला. हा गांजा, मोबाईल मोहम्मद सानू पठान आणि अमित सोमकुंवर या दोन कैद्यांनी मागवला होता, अशी माहिती समोर येताच कारागृह अधीक्षकांनी टॉवरवरील एका कर्मचाऱ्याला नोटीस दिली आहे. या प्रकरणी धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मो. सानू आणि अमित सोमकुंवर हे दोघेही कारागृहात बंद आहेत. त्यांना गांजाची सवय आहे. कारागृहात मोबाईल आणि गांजा बिनधास्त मिळत असल्यामुळे दोघांनीही प्रयत्न केला. दोघांनीही त्याच्या एका मित्राला मोबाईल फोन आणि दोन सीमकार्ड आणि ६ बँटरी आणि ३४६ ग्रँम गांजा एका पिशवीतून कारागृहात फेकण्यास सांगितले होते. गुरुवारी भरदुपारच्या सुमारास एका युवकाने कारागृहाच्या टॉवरजवळून आतमध्ये पिशवी फेकली. तेथे गायकवाड नावाचा कारागृह कर्मचारी तैनात होता. तो विनापरवानगी तेथून बेपत्ता होता. त्यावेळी त्या परिसरात तीन कैदी काम करीत होते. त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्याला ती पिशवी दिसली. त्याने उघडून बघितली असता त्यात मोबाईल, गांजा आणि सीमकार्ड आढळून आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती देण्यात आली. या प्रकरणी दोन कैद्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गायकवाड नावाच्या कर्मचाऱ्याचीही विभागीय चौकशी सुरु करण्यात येणार आहे.